“भाजपाचा टोल फ्री क्रमांक हा नेटफ्लिक्सचा नसून तो पक्षाच्या नावाने नोंदणी असलेला क्रमांक आहे,” असं स्पष्टीकरण देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना द्यावे लागले आहे. मागील काही दिवसांपासून केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. म्हणूनच या कायद्याला भारतीयांचा पाठिंबा मिळावा म्हणून भाजपाने टोल फ्री क्रमांकावर फोन करुन तुमचा पाठिंबा नोंदवा ही मोहिम सुरु केली होती. मात्र त्यावरुन गोंधळ निर्माण झाल्यानंतर शाह यांनाच स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) जास्तीत जास्त भारतीयांचा पाठिंबा मिळावा म्हणून भाजपाने काही दिवसांपूर्वीच ८८६६२८८६६२ हा टोल फ्री क्रमांक जारी केला. या क्रमांकावरुन मीस कॉल देऊन सीएए कायद्याला पाठिंबा द्या असं आवाहन भाजपाने केलं होतं. मात्र या क्रमांकावरुन अनेकांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे. विरोधीपक्षांबरोबरच नेटकऱ्यांनाही या मोहिमेवरुन भाजपावर टीका केली आहे. हा क्रमांक ‘नेटफ्लिक्स’चा असल्याची चर्चाही सोशल नेटवर्किंगवर चांगलीच रंगली. या क्रमांकाच्या विश्वासार्हतेवरुन सुरु असलेल्या या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शाह यांनी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सोमवारी अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याशी संबंधित भाजपाने जारी केलेल्या क्रमांकाचा ‘नेटफ्लिक्स’शी संबंध नसल्याचे म्हटलं आहे. शाह यांच्या स्पष्टीकरणाबरोबर भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या क्रमांकावरुन भाजपावर टीका करणाऱ्या विरोधीपक्षाचाही आपल्या भाषणामध्ये समाचार घेतला. “विरोधकांचे राजकारण केवळ गोंधळ निर्माण करण्याचे काम करतं,” असा टोला पात्रा यांनी लगावला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधारित नागरिकत्व कायदा आणला आहे. या कायद्याला कॅबिनेटने मंजूरी दिली, लोकसभेमध्येही या कायद्याला पाठिंबा मिळाला. मात्र केजरीवाल, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रासारख्या तज्ज्ञांनी जनतेची दिशाभूल करण्याची आणि दंगल घडवून आणण्याची कामं केली. जे सरकार दिल्लीमध्ये दंगल घडवते असे सरकार तुम्हाला हवे आहे का असं मी तुम्हाला विचारु इच्छितो,” असं अमित शाह म्हणाले.

सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन मिळवण्यासाठी भाजपाने जारी केलेल्या क्रमांकावरुन भाजपाला लक्ष्य केलं जात असल्यावरुन पात्रा यांनी नाराजी व्यक्त केली. “या क्रमांकावरुन खिल्ली उडवणे चुकीचं आहे. या क्रमांकाचा संदर्भ देत अश्लील स्तरावरील टीका करणे अयोग्य आहे. हा क्रमांक केवळ सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भातील असल्याचे पक्षाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे,” असं पात्रा म्हणाले.

“भाजपाचे नेते सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल घरोघरी जाऊन जागृकता निर्माण करण्याचं काम करत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेता प्रकाश करात यांनी या कायद्याचे समर्थन केलं होतं. मात्र भाजपाचे हा कायदा अंमलात आणल्यानंतर हे लोक या कायद्याचा विरोध करु लागले,” अशी टीकाही पात्रा यांनी केली.