नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आसामसह ईशान्येकडील राज्यात हिंसाचाराचे उफाळला असून, ही आग राजधानी दिल्लीतही पोहचली आहे. रविवारी दुपारी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत तीन बस पेटवून दिल्या. या घटनेनंतर मथुरा रोड परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

नागरिकत्व कायदा दुरूस्तीनंतर लागू केल्यानंतर आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विधेयक संसदेत मांडल्यानंतर याविरोधात रोष व्यक्त व्हायला लागला होता. कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर हिंसाचार उफाळून आला. ठिकठिकाणी पोलिसांच्या गोळीबारात पाच जण मरण पावले असून, हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत.

अनेक राज्यांकडून या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध होत असतानाच भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेनं या कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक राज्यसभेत मांडल्यानंतर आसाम गण परिषदेनं त्याला पाठिंबा दिला होता. मात्र, वाढलेल्या हिंसाचारानंतर त्यांनी भूमिका बदलली आहे. “आम्ही नागरिकत्व कायदा आसाममध्ये लागू होऊ देणार नाही. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत,” अशी माहिती आसाम गण परिषदेचे ज्येष्ठ नेते रामेंद्रा कलिता यांनी रविवारी दिली.

दरम्यान, ईशान्यकडील विरोधाच्या आगीचे लोळ राजधानी दिल्लीतही पोहोचले आहेत. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. रास्ता रोको करत विद्यार्थ्यांनी भारत नगर येथे दिल्ली परिवहन मंडळाच्या तीन बस पेटवून दिल्या. या आगीनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त प्रचंड वाढविण्यात आला असून, काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.