नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या टिप्पणीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सडतोड उत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रत्येक वक्तव्यावर, प्रतिक्रिया देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. त्यांची सर्व वक्तव्य चुकीची आहेत, त्यांनी भारताच्या अंतर्गत प्रकरणांवर टिप्पणी करण्यापेक्षा पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीकडे लक्ष द्यायला हवे. असे भारताचे पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले आहे.

इम्रान खान यांनी ट्विटद्वारे या विधेयकावर टीका केली होती. भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याच्या सर्व नियमांचे तसेच पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. शिवाय, त्यांनी मोदी सरकार आणि भाजपाची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील टीका केली होती. नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेचा भाग आहे असा दावा त्यांनी केला होता.

पाकिस्तानबरोबरच बांगलादेशकडूनही नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचा विरोध दर्शवण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे पराराष्ट्रमंत्री एके अब्दुल मेमन यांनी आपला नियोजित भारत दौरा रद्द केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे भारताची धर्मनिरपेक्ष देश म्हणून असलेली ऐतिहासिक प्रतिमा कमकुवत होणार आहे असे अब्दुल मेमन यांनी म्हटले होते. “भारत धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असलेला एका सहिष्णू देश आहे. पण भारत त्या मार्गावरुन विचलित झाल्यास त्यांचे ऐतिहासिक स्थान कमकुवत होईल” असेही मेमन म्हणाले होते.