लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना एकाहून एक मोठी भेट देत आहे. मोदी सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. महागाई भत्त्यात ही तीन टक्के वाढ असून सुमारे एक कोटी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना त्याचा लाभ मिळेल. ही वाढ १ जानेवारी २०१९ पासून लागू करण्यात येईल.

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता 3 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. पूर्वी ९ टक्के महागाईभत्ता असणारा आता १२ टक्के झाला आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १९६८ कोटी रूपयांचा आतिरिक्त भार पडणार आहे.

दिल्ली-गाझियाबाद-मेरठचा रॅपिड ट्रांझिट सिस्टम (आरआरटीएस) बांधण्याचा प्रस्ताव आणि अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प फेज-२ चा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर केल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. यामध्ये सरकारच्या तिजोरीवर ३०२७४ कोटींचा भार पडणार आहे.