14 December 2019

News Flash

तिहेरी तलाक ठरणार गुन्हा, अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. तिहेरी तलाक संबंधीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करुन घेण्यात अद्याप सरकारला यश आलेले नाही.

 

तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. तिहेरी तलाक संबंधीचे विधेयक राज्यसभेत मंजूर करुन घेण्यात अद्याप सरकारला यश आलेले नाही. केंद्र सरकारने तिहेरी तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणारे विधेयक लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केले.

पण राज्यसभेत हे विधेयक अडकून पडले आहे. विरोधी पक्षांना या विधेयकातील काही मुद्यांवर आक्षेप आहे. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक संबंधी निकाल देताना तिहेरी तलाकला घटनाबाह्य, बेकायद ठरवले होते तसेच केंद्र सरकारला यासंबंधी कायदा करण्यासही सांगितले होते.

तिहेरी तलाक विरोधातील या विधेयकात केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात तीन सुधारणा केल्या आहेत. नव्या सुधारणांनुसार प्रस्तावित कायदा अजामिनपात्र आहे. पण खटला चालू होण्यापूर्वी आरोपी जामिनासाठी न्यायादंडाधिकाऱ्याकडे दाद मागू शकतो. अजामिनपात्र गुन्हा असल्यामुळे पोलीस परस्पर आरोपीची सुटका करु शकत नाहीत.

दुसऱ्या सुधारणेनुसार पतीने तीनवेळा तलाक शब्द उच्चारुन तलाक दिल्यास पीडित पत्नी किंवा तिच्या जवळचे नातेवाईक आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल करु शकतात. त्यानंतर पीडित पत्नी पतीबरोबर तडजोड करण्यास तयार असेल तर न्यायाधीश आपल्या अधिकाराचा वापर करुन तोडगा काढू शकतात. अशावेळी गुन्हा मागे घेता येऊ शकतो.

 

First Published on September 19, 2018 12:19 pm

Web Title: cabinet approves ordinance on triple talaq
टॅग Supreme Court
Just Now!
X