केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. भारतामध्ये अत्यंत वेगाने आणि चांगल्या पद्धतीने करोना प्रतिबंधक लसींचे लसीकरण केलं जात आहे. आतापर्यंत चार कोटी ८५ लाख करोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी चार कोटींपेक्षा असे व्यक्ती आहेत ज्यांना करोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत असं जावडेकरांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्याचप्रमाणे मागील २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना करोनाचे डोस देण्यात आले आहेत असंही जावडेकरांनी सांगितलं. फेब्रुवारीमध्ये दिवसाला तीन लाख ७७ हजार करोनाचे डोस दिले जायचे. मार्च महिन्यात ही दैनंदिन आकडेवारी १५ लाख ५४ हजारांपर्यंत गेली आहे, असंही जावडेकरांनी स्पष्ट केलं. मागील आठवड्यामध्ये (१४ ते २० मार्च दरम्यान) दिवसाला करोना लसींचे २० लाख डोस देण्यात आल्याची माहितीही जावडेकरांनी दिली.

पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवा आणि करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर १६ फेब्रुवारीपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांचं लसीकरण सुरु करण्यात आलं. त्यानंतर एक मार्चपासून ४५ हून अधिक वय असणाऱ्या आणि इतर व्याधी असणाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये करोना टास्क फोर्सचा सल्ला आणि वैज्ञानिक आधारांच्या सहाय्याने दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यापैकी पहिला निर्णय म्हणजे ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना करोनाची लस उपलब्ध होणार आहे, असं जावडेकरांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तसेच या बैठकीमधील दुसरा महत्वाचा निर्णय असा घेण्यात आला आहे की दोन डोसदरम्यान चार किंवा सहा आठवड्यांचा वेळ असावा असं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र आता कोविशिल्डचा डोस चार ते आठ आठवड्यांच्यादरम्यान घेणं योग्य ठरेल असं संशोधकांना दिसून आलं आहे. त्यामुळे ही सवलतही देण्यात आली आहे, असंही जावडेकरांनी सांगितलं आहे.

करोनाची लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे असंही जावडेकरांनी सांगितलं आहे. भारतात निर्माण केलेल्या करोनाच्या दोन्ही लसी उत्तम परिणामकारक आहेत. खुद्द पंतप्रधान मोदींनी कोव्हॅक्सीन लस घेत या मोहिमेचा शुभारंभ केला होता, असं जावडेकर म्हणाले.