कामगार निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत कामगारांना किमान निवृत्तिवेतन एक हजार रुपये करण्याचा प्रस्ताव असून त्यास मान्यता द्यावी म्हणून मंत्रिमंडळाचे मन वळविण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय कामगार राज्यमंत्री कोडीकुन्नी सुरेश यांनी सोमवारी येथे दिली. या निर्णयाचा फायदा सुमारे २८ लाख निवृत्तिवेतनधारकांना होईल. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी मंडळाने किमान निवृत्तिवेतन एक हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय आधीच घेतला असून त्यास मंत्रिमंडळाच्या संमतीची आवश्यकता आहे, असे सुरेश यांनी सांगितले.  सध्या कामगारांना त्यांच्या वेतन संरचनेनुसार ३० रुपयांपासून ते ६५० रुपयांपर्यंतच्या कोणत्याही रकमेपर्यंत निवृत्तिवेतन मिळते. याखेरीज, दरमहा साडेसहा हजार रुपयांपर्यंत दरमहा वेतन घेणाऱ्यांसाठी भविष्यनिर्वाह निधी सक्तीचा असून ही मर्यादा १५ हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी कामगार संघटनांनी आधीच केली आहे.