News Flash

भारतीय वायू दलाला मिळणार नवी मालवाहू विमाने

मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय, एअरबसचे तंत्रज्ञान असलेली C - २९५ जातीची एकूण ५६ विमाने दाखल होणार

C-295-Plane
भारतीय वायू दलाला मिळणार नवी मालवाहू विमाने

भारतीय वायू दलाला आवश्यक असलेली मालवाहू विमाने मिळण्याचा मार्ग आज अखेर मोकळा झाला आहे. ४ ते १० टन पर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली एकूण ५६ C – २९५ मालवाहू विमाने घेण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या भारतीय वायू दलात असलेल्या, जुन्या तंत्रज्ञानाच्या HS ७४८ Avro या मालवाहू विमानांची जागा C -२९५ ही मालवाहू विमाने घेतील. पॅराट्रुपर्स आणि सैन्य दलासाठी आवश्यक सामानाची वाहतूक करण्याकरता या मालवाहू विमानांचा उपयोग होणार आहे.

एअरबस कंपनीची ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ आणि टाटाची ‘ टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड’ हे संयुक्तरित्या भारतात C – २९५ या मालवाहू विमानांची निर्मिती करणार आहेत. यासाठी दोन्ही कंपन्या आणि भारतीय वायू दल असा तिघांमध्ये करार होणार आहे. हा एकूण करार सुमारे अडीच अब्ज डॉलर्स एवढा असणार आहे. करार झाल्यानंतर ४८ महिन्यांत एअरबस पहिली १६ विमाने थेट भारतीय वायू दलाकडे हस्तांतरित करणार आहे. तर उर्वरित ४० विमाने ही भारतात एअरबस आणि टाटा हे संयुक्तरित्या बनवणार आहेत.

१९६० दशकांतील तंत्रज्ञान असलेली HS ७४८ Avro मालवाहू विमाने एकेकाळी भारतीय वायू दलाचा कणा होती. मात्र जुने झालेले तंत्रज्ञान, वारंवार होणारे अपघात, देखभालीसाठी होणार खर्च लक्षात घेता ही Avro विमाने सेवेतून बाद करण्याचा निर्णय २०१० च्या सुमारास घेण्यात आला. या विमानांची जागा घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र विविध कारणांनी या प्रक्रियेला उशीर होत आज अखेर नव्या मालवाहू विमानाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

एअरबस कंपनीनचे तंत्रज्ञान असलेली C -२९५ जातीची मालवाहू विमाने ही जगातील १५ देशांच्या वायू दलात २००१ पासून कार्यरत आहेत. १० टन पर्यतचे वजन एका दमांत २००० किलोमीटर पर्यंत वाहून नेण्याची या मालवाहू विमानांची क्षमता आहे. जगातील अत्याधुनिक अशा या मालवाहू विमानांच्या समावेशामुळे भारतीय वायू दलाच्या ताकदीत मोलाची भर पडणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच देशातील खाजगी कंपनी मालवाहू विमानांची निर्मिती करणार असून यामुळे ६ हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 10:53 pm

Web Title: cabinet cleared the purchase of 56 c 295 medium transport aircraft asj82
Next Stories
1 ब्रह्मपुत्रा नदीत १२० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली, अनेकजण बेपत्ता; पंतप्रधानांचे ट्विट
2 कन्नड भाषेबाबत चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती दाखवल्याबद्दल Google नं मागितली माफी!
3 Video : “हिजाब न घातलेल्या स्त्रिया कापलेल्या कलिंगडासारख्या”, तालिबान्यांनी केली तुलना, नेटिझन्स संतापले!
Just Now!
X