पंतप्रधान मोदी यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या ‘नमामी गंगे’ ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून गंगेची स्वच्छता व संरक्षणासाठी २० हजार कोटींचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या तीन दशकांत नद्या संवर्धनासाठी खर्च केलेल्या निधीच्या चौपट वाढ करण्यात आली आहे. गंगा स्वच्छतेचा हा कार्यक्रम पाच वर्षांचा आहे. १९८५ पासून केंद्र सरकारने यासाठी फक्त चार हजार कोटींच्या जवळपास खर्च केला आहे. १९८६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी गंगा कृती मोहीम सुरू केली होती. यासाठी ४६२ कोटी रुपये मंजूर केले होते. गंगेचे प्रदूषण रोखणे व पाण्याची स्वच्छता वाढविणे असे या योजनेचे स्वरूप होते. मात्र सध्या गंगा देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी असून तिने मर्यादेपेक्षा ३००० पट प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ‘नमामी गंगे’ ला पूर्ण निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.