केंद्र सरकारमधील कॅबिनेट मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. राजीवप्रताप रूडी, उमा भारती, संजीव बालियान आणि फग्गनसिंह कुलास्ते यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधानांना पाठवला आहे. राजीनाम्यानंतर आता मंत्र्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. राजीवप्रताप रूडी यांनी हा माझा निर्णय नव्हता. पंतप्रधानांनी तो घेतला होता. मी पक्षाचा एक सेवक आहे. पक्ष सांगेन तो आदेश मी पाळेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दुसरीकडे संजीव बालियान यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पक्षाने मला राजीनामा देण्यास सांगितला. त्यांनी का राजीनामा मागितला मला माहीत नाही. पण त्यांनी सांगताच मी एका ओळीचा राजीनामा लगेच पाठवला. पण पक्षाचा आदेश पाळताना मी आनंदी आहे, असे त्यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना म्हटले.

राजीवप्रताप रूडी हे कौशल्य विकास मंत्री होते. मागील आठवड्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर त्यांची दीर्घकाळ चर्चा झाली होती. पंतप्रधान मोदी हे रविवारी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. गुरूवारी संध्याकाळी शहा यांनी आपली भेट घेतल्याचे रूडी यांनी सांगितले. त्यांनी निर्णय घेतला आणि मला सांगितला, असे ते म्हणाले. पक्ष तुम्हाला कर्नाटक आणि गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी देणार आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सध्या तरी मी पद सोडले आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलेल्या मंत्र्यांना पक्ष संघटनेत स्थान दिले जाऊ शकते, असे बोलले जाते. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार मानला जातो. या कॅबिनेट विस्तारात संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) दोघांना संधी मिळू शकते. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय आरसीपी सिंह आणि संतोष कुशवाहा यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेकडून एक आणि तेलगु देशमचा एक मंत्री होऊ शकतो. असेही म्हटले जाते की, तेलगू देशमला एक मंत्रिपद देण्याऐवजी त्यांच्या सध्याचाच राज्यमंत्र्याला कॅबिनेटपदी बढती दिली जाऊ शकते.