केबल सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये सुसूत्रता राहावी, तसेच या व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून मल्टिपल सिस्टीम ऑपरेटर्स (एमएसओ)मार्फत येत्या सप्टेंबर महिन्यापासून केबलची बिले थेट ग्राहकाच्या घरी पाठविण्याच्या पर्याय अवलंबिला जाणार आहे.
सध्या स्थानिक केबलचालकांद्वारे केबल टीव्ही वापराचे शुल्क ग्राहकांकडून गोळा केले जाते आणि अखेरीस ते एमएसओंकडे पाठविण्यात येते. मात्र या पद्धतीबाबत अनेक तक्रारी आहेत. अनेकदा समान वाहिन्या वापरणाऱ्या ग्राहकांना भिन्न शुल्क आकारले जाते, तर अनेकदा शुल्कामध्ये सरकारी करांचा समावेश केला जात नाही. यामुळे ग्राहकांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय एमएसओने घेतला आहे.
केबलचालकांकडून आकारले जाणारे शुल्क हे ‘पॅकेज’मध्ये ठरविण्यात आल्याप्रमाणे असावे, तसेच ग्राहकांना मनमानी पद्धतीने केल्या जाणाऱ्या शुल्क आकारणीचा त्रास होऊ नये यासाठी आता ‘थेट बिल पद्धती’ राबविण्यात येणार आहे. एमएसओने घेतलेला हा निर्णय म्हणजे केबलच्या क्षेत्रातील अत्यंत क्रांतिकारी पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया आघाडीचे केबलचालक असलेल्या डीईएन नेटवर्कच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रत्येक ग्राहकाला आपण निवडलेल्या वाहिन्या आणि त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क यांची पूर्वकल्पना असल्याने आता त्यांना थेट बिले पाठविली जातील आणि त्यांनाही आपल्या बिलांची योग्यायोग्यता तपासता येईल. शिवाय अवाजवी शुल्काच्या आकारणीतून त्यांची मुक्तता होईल, असा विश्वास अनेक एमएसओंनी व्यक्त केला.
सुरुवातीस ही पद्धती दिल्ली आणि मुंबई या दोनच शहरांमध्ये सप्टेंबरपासून राबविण्यात येणार असून त्यानंतर हळूहळू देशभरात कार्यान्वित केली जाईल.

ग्राहकांचा फायदा
* अतिरिक्त शुल्कातून मुक्तता
* अवाजवी शुल्क आकारणीचा जाच नाही
* समान वाहिन्या, समान शुल्क आकारणी
* नव्या पद्धतीबाबत जागृती अभियान
एमएसओंचा फायदा
* ग्राहक संख्याधारित महसूल
* स्थानिक केबलचालकांच्या ‘चोरी’पासून मुक्तता
* सरकारच्या करसंकलनातही वाढ
* व्यवहारांमध्ये पारदर्शकता