कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन देणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळाने मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा व्याजासह कमी रक्कम पाच कोटी ग्राहकांना दिल्याचे उघडकीस आले आहे. सन २००७-०८ आणि २०१०-११ या काळात मंडळाने ग्राहकांना नियमानुसार रक्कम दिली नसल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे. कॅगचा अहवाल मंगळवारी संसदेत मांडण्यात आला. त्यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळाचा (ईपीएफओ) गैरकारभार समोर आला आहे.
कॅगच्या अहवालानुसार ईपीएफओला सन २००६-०७ मध्ये सात हजार ७७९.६३ कोटी उत्पन्न मिळाले, तर पीएफ ग्राहकांना सात हजार कोटी ९७६.२४ कोटी वितरित करण्यात आले, तसेच २०११-१२ मध्येही १७ हजार ८७९.९५ कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनते २३ हजार १४५.८१ कोटी रुपये पीएफ ग्राहकांना वितरित करण्यात आले. मात्र २००७-०८ मध्ये मंडळाला आठ हजार ७०६.८८ कोटीचे उत्पन्न प्राप्त झाले. परंतु केवळ सात हजार ८५४.६० कोटीच पीएफ ग्राहकांना परत करण्यात आले. याशिवाय २००८-०९ मध्येही १० हजार ६६७.४३ कोटींचे उत्पन्न असताना ग्राहकांना केवळ ९ हजार २६८.१५ कोटीच वितरित करण्यात आले. २००९-१० मध्येही मंडळाने ११ हजार ९३३.८८ कोटी उत्पन्नाच्या बदल्यात ९ हजार ६३१.९६ कोटी पीएफ ग्राहकांना वितरित केले. तर २०१०-११ या वर्षांत १४ हजार १८१.९० कोटी उत्पन्नाच्या तुलनेत आठ हजार ७१९.९६ कोटीच वितरित केल्याचे कॅगने अहवालात नमूद केले आहे. ईपीएफओने आपल्या ग्राहकांना सेवा देताना योग्य ती काळजी घेतलेली नाही. तसेच खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत योग्य ती कार्यवाही केली नसल्याचे ताशेरेही कॅगने आपल्या अहवालात मारले आहेत.