अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथील बायोलॉजिकल पार्कमध्ये वाघिणीच्या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिल्याने वाघिणीने ३५ वर्षीय कर्मचाऱ्यावर हल्ला केला. पौलाश करमाकर असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. आसाममधील लखीमपूर जिल्हातील दीकाईजुली येथील रहिवाशी असणाऱ्या पौलाश यांनी मंगळवारी वाघिणीच्या पिंजऱ्यातील पाण्याची जागा साफ करण्यासाठी गेला होता. त्यानंतर वाघिणीने त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख असणाऱ्या राया फ्लॅगो यांनी सांगितलं.

“हा प्रकार मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडला. आमच्या येथील एका कर्मचाऱ्याने मला यासंदर्भातील माहिती दिली. तेव्हा मी, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत तातडीने त्या पिंजऱ्याजवळ पोहचलो, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला. करमाकर यांचा मृतदेह वाघिणीच्या पिंजऱ्याजवळ पडला होता. वाघिणीने त्याच्या चेहऱ्यावर हल्ला केला होता,” असं फ्लॅगो यांनी सांगितलं.

“पिंजऱ्याला तीन गेट आहेत. ती सर्व गेट एकाच वेळी सुरु राहिली. त्यामुळेच या वाघिणीने थेट कर्मचाऱ्यावर हल्ला केला,” असं फ्लॅगो यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये चौकशी सुरु केलीय.

इटानगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कमदम सिकोम यांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यूचं असल्याचं सांगितलं, गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. करमाकर यांचा मृतदेह आर. के. मिशन रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. “यामध्ये काही घातपात झाल्याची शक्यता पोलिसांना वाटत नाही. प्राथमिक चौकशीमध्ये हा बेजबाबदारपणाचा प्रकार वाटत आहे,” असं सिकोम यांनी सांगितलं आहे.

करमाकर यांच्यावर हल्ला करणारी वाघीणचं नाव चिपी असं आहे. बंगाल टायगर प्रजातीची ही वाघीण आहे. २०१३ पासून ही वाघीण या प्राणीसंग्रहालयामध्ये आहे. ही वाघीण इप्रा या दुसऱ्या एका वाघिणीसोबत आठ महिन्याची असताना जंगलामध्ये सापडली होती.