बिपिन देशपांडे, औरंगाबाद

विडय़ाचे पान खाणाऱ्या शौकिनांना आपल्या लाडक्या सवयीला काहीशी मुरड घालावी लागणार आहे. नागवेलीच्या साध्या आणि कलकत्ता पानांच्या दरात जवळपास दुप्पट वाढ  झाली आहे. पश्चिम बंगालमधील काही भागाला मध्यंतरी पुराचा फटका बसला. त्यातून तेथील पानमळ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी कलकत्ता पानांचे दर वाढले आहेत.

गेल्या महिनाभरापासून दरवाढ होऊन कलकत्ता पानांचा माल राज्यात येत असल्याचे येथील उस्मानपुरा भागातील महात्मा फुले भाजी मंडईतील ठोक व्यापारी मोहंमद शरीफ यांनी सांगितले. फुले भाजी मंडईत आता दररोज चार ते पाचच डाग येतात. एका डागामध्ये चार हजार कलकत्ता पानांचे नग असतात. पूर्वी ही संख्या जास्त होती. शिवाय कोलकात्याहून माल औरंगाबाद आणि राज्यातील इतर भागांपर्यंत पोहोचेपर्यंतचा घेतला जाणारा हवाला मूळ व्यापारी घेत नाहीत. यामध्ये व्यापाऱ्यांचे नुकसान होते. बऱ्याच वेळा एखादा डाग हरवला तर २५ हजार रुपयांपर्यंतचे नुकसान सोसावे लागते. त्यामुळे आवक कमीच केली जात आहे. कोलकाता भागाला यंदाच्या पावसाळ्यात पुराचा मोठा फटका बसला. त्यामुळे दरवर्षी हिवाळ्यात होणारी दरवाढ यंदा दोन महिने आधीच झाली, असेही मोहंमद शरीफ यांनी सांगितले.  गावरान नागवेलीची पाने ही चेन्नई येथून शहरात येतात. त्यांच्याही दरात जवळपास दुपटीने वाढ झालेली आहे. तमिळनाडूतील व्यापाऱ्यांशी व्यावहारिक संबंध दृढ झाल्यामुळे चेन्नईतूनच साध्या व गावरान नागवेलीची पाने मागवली जात असल्याचे व्यापारी सांगतात.

पानव्यवहार..

जालना जिल्ह्य़ातील भारज, जळगावजवळील कुऱ्हे (पानांचे), उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमरगा आदी परिसरातील काही गावे पानमळ्यांसाठी प्रसिद्ध होती.  मात्र, आता ही संख्या बोटावर मोजण्याइतकीच उरली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश पानमळे आता नामशेष झाले आहेत. त्यामुळे राज्याशी चेन्नई, कोलकाता येथूनच बहुतांश पानांचा व्यवहार होतो.

नर-मादी पान :

नागवेलीच्या पानांमध्ये ‘नर’  व ‘मादी’ असे दोन प्रकार मानले जातात. मात्र हे दोन्ही प्रकार अलीकडच्या काळातील पान विक्रेत्यांना फारसे माहीत नाहीत. ‘नर’ पान हे एकाच बिंदूतून निघालेल्या तीन शिरांवरून ओळखले जाते. तर बिंदूपासून हललेल्या शिरांना ‘मादी’ पान म्हटले जाते. ‘नर’ पान पूर्वी विशिष्ट जमातीतील लोक खात असत, अशी माहिती एका पान विक्रेत्याने दिली.

दरस्थिती..

साधे नागवेलीच्या पानांचे दर  ३० ते ३५ रुपये शेकडय़ावरून ६० ते ६५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर कलकत्ता पानांचे दर अडीचशेवरून ४५० पर्यंत ते ५०० रुपये शेकडय़ांपर्यंत भडकले आहेत.