काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात गोवंश वाचवण्यासाठी एक नवीन शक्कल लढवल्याचे समोर आले आहे. येथील एका गावात कालवड जन्माचा मोठा उत्सव साजरा करण्याची तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी निमंत्रण पत्रिका पाठवून पाहुण्यांना बोलावले जात आहे. यासाठी हजारो लोकांच्या भोजनाची सोयही केली जाणार आहे.

अमेठी येथील विनोदकुमार नावाचा शेतकरी ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणत आहे. गौरीगंज परिसरातील चंदईपूर गावातील विनोदकुमार उर्फ झवेले सिंह हे गोपालक शेतकरी आहेत. सध्या त्यांच्याकडे दोन गायी आहेत. यातील एका गायीने १६ जानेवारी रोजी एका कालवडाला जन्म दिला. त्यावेळी घरात मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ज्याप्रमाणे घरात एखाद्याला अपत्य झाल्यानंतर आनंदाचे वातावरण असते. अगदी तसेच वातावरण विनोदकुमार यांच्या कुटुंबात होते.

हा आनंदोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची कुटुंबातील काही व्यक्तींनी इच्छा व्यक्त केली. यासाठी जेवणावळीचा घाट घालण्यात आला आहे. यासाठी गुरूजींकडून गुरूवारचा (दि. २४) शुभ मुहूर्त काढण्यात आला आहे. सुमारे १० हजार निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विविध ठिकाणी होर्डिंग्जही लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर अनेक गावांमध्ये जाऊन निमंत्रणही दिले आहे.

विनोदकुमार यांच्या आनंदात गावकरीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. जेवणावळीची तयारी केली जात आहे. यावेळी ग्रामस्थांनी संगीत, नाटक आदींचे आयोजन केले आहे. कालवडाच्या जन्मापासूनच गावातील महिलांकडून दररोज सांयकाळी एकत्र येऊन गाणी म्हटली जात आहेत.

विनोदकुमार म्हणाले की, जे लोक गायीची पुजा करतात. तिचे दूध पितात किंवा विकतात. पण कालवड झाल्यानंतर त्याला रस्त्यावर सोडून देतात किंवा कसायला विकतात. आमची ही मोहीम अशा लोकांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी आहे. गोमाता किंवा गोवंश आमच्यावर भार नाही. उलट ती आमची जबाबदारी आहे. जेव्हा आपल्या घरात मुलांचा जन्म होतो. तेव्हा आपण आनंदोत्सव साजरा करतो. मग गोमातेला संतान झाल्यानंतर चिंताग्रस्त होऊन ते मरण्यासाठी का सोडायचे असा सवाल त्यांनी केला.