कॅलिफोर्नियातील शिक्षण मंडळाने समाजशास्त्र व इतिहासाचा अभ्यासक्रम मंजूर केला असून त्यात हिंदुत्व, प्राचीन भारत यांचे चुकीचे चित्र रंगवण्यात आलेले नाही उलट त्यात अतिशय सकस असा आशय देण्यात आला आहे. इस्लामबाबतचा आक्षेपार्ह मजकूरही वगळण्यात आला आहे. भारताला दक्षिण आशियायी संबोधण्याचा मनसुबा आधी कॅलिफोर्नियाच्या शिक्षण मंडळाने आखला होता पण त्यावर याचिकेच्या माध्यमातून शिक्षणतज्ज्ञ व भारतीय पालकांनी जनक्षोभ व्यक्त केल्याने कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाला त्याची दखल घ्यावी लागली होती. या प्रस्तावित अभ्यासक्रमात अनेक आक्षेपार्ह विधाने होती.

प्राचीन भारत ऐवजी दक्षिण आशिया असा उल्लेख करण्याला तज्ज्ञांचा आक्षेप होता. त्याबाबत बऱ्याच प्रतिक्रिया आल्यानंतर ही सुधारणा मागे घेण्यात आली.  हिंदू एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक संदीप देडगे यांनी सांगितले, की   हिंदुत्वाबाबत व भारतीय संस्कृतीबाबतचा आशय इतर धर्म व संस्कृती यांच्या समान पातळीवर आणण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे पण गेल्या दोन वर्षांत बरीच प्रगती झाली असून वादग्रस्त व चुकीचे उल्लेख टाळण्यात आले आहेत. आताच्या नव्या अभ्यासक्रमात वेदिक ऋषी, हिंदू शिकवण, तत्त्वज्ञान व भक्ती, संत, संगीत, नृत्य, कला व विज्ञानातील योगदान यांचा विचार करण्यात आला आहे. अंतिम सुनावणीच्या वेळी काँग्रेस सदस्या तुलसी गबार्ड व कॅलिफोर्नियाचे लेफ्टनंट गव्हर्नर गाविन न्यूसॉम यांनी भारताच्या भूमिकेचा विचार केला. नव्या अभ्यासक्रमात चुकीचे उल्लेख टाळण्यात आले आहेत, असे टॉम टोरलाकसन यांनी सांगितले. हिंदुत्वाला समान प्रतिनिधित्व देण्यात आले आहे, तरी अजून यात बरीच प्रगती आवश्यक आहे, असे सामाजिक व धार्मिक विभागाच्या अधिष्ठाता गटाच्या प्रमुख बार्बरा मॅकग्रॉ यांनी सांगितले.  इस्लाम व मुस्लिमांबाबत जेवढी संवेदनशीलता अभ्यासक्रमात दाखवण्यात आली, तेवढी अजूनही हिंदू धर्माबाबत दाखवली नाही, असे हिंदू अमेरिकन फाउंडेशनचे वरिष्ठ संचालक समीर कालरा यांनी नाराजीचा सूर कायम ठेवत सांगितले.