गव्हर्नरांसह दोन संघटनांचे पत्र

कॅलिफोर्निया प्रांतातील शालेय पाठय़पुस्तकातून हिंदुत्वाचे चुकीचे प्रतिनिधीत्व न करता योग्य व अचूक माहिती आली पाहिजे असे कॅलिफोर्नियाचे लेफ्टनंट गव्हर्नर व इतर ४० शिक्षणतज्ञांनी सांगितले. सध्या कॅलिफोर्नियातील शालेय पुस्तकांमध्ये सुधारणा करण्याचे काम चालू आहे.

लेफ्टनंट गव्हर्नर गॅविन न्यूसॉम यांनी कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तरुण अमेरिकी भारतीय व हिंदू अमेरिकी विद्यार्थी यांचा दृष्टिकोन किंवा मते विचारात घ्यावीत, हिंदूू धर्माचा चुकीचा इतिहास मुलांपुढे जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तुम्ही ज्या सुधारणा कराल त्या योग्यच असतील अशी आशा आहे. न्यूसॉम यांनी अभ्यासमंडळाला पाठवलेले हे पत्र म्हणजे हिंदू अमेरिकी पालकांसाठी आशेचा किरण असून या पालकांनी हिंदू धर्माचे चुकीचे चित्र रंगवण्यात येऊ नये असे म्हटले आहे.

कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाने गेल्या बैठकीत के १२ इतिहास, सामाजिक शास्त्रे या विषयाच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या एका पत्रात चाळीस शिक्षण तज्ञांनी कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाने हिंदू धर्माचे चुकीचे चित्र पाठय़पुस्तकातून सामोरे येणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी केली होती.

भारतीय हिंदुत्ववादाची मांडणी करताना मुद्दाम नकारात्मक बाबींवर भर दिला जातो तसे होता कामा नये. तसेच या पुस्तकांमध्ये सामाजिक आशयाचे लेखन करताना असमानता नसावी. भारत व हिंदू धर्म यांना  यात वेगळे काढून टीकेचा भडिमार केला जातो हे योग्य नाही, असे या शिक्षण तज्ञांचे म्हणणे आहे.

शिक्षण मंडळाच्या समन्वयक बार्बरा ए मॅकग्रा या सेंट मेरी कॉलेज ऑफ कॅलिफोर्निया या संस्थेत नीतिशास्त्र, कायदा व सार्वजनिक जीवन या विषयाच्या प्राध्यापक आहेत. हिंदू अमेरिकन फाउंडेशननेही या पुस्तकांमध्ये हिंदू धर्माचे चुकीचे चित्र रंगवले जाण्याची भीती व्यक्त केली असून आता अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या हिंदू सदस्या तुलसी गॅबार्ड यांनीही हिंदूत्वाला शालेय अभ्यासक्रमात योग्य स्थान मिळाले पाहिजे असे कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाला सांगितले आहे.