अमेरिकन नागरिकांची बनावट कॉल सेंटरद्वारे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने चार भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाला दोषी ठरवले आहे. राजूभाई पटेल (३२), विराज पटेल (३३), दिलीपकुमार पटेल (५३) आणि पाकिस्तानी नागरिक फहाद अली (२५) अशी या आरोपींची नावे आहेत. तर हार्दिक पटेल या आरोपीला २ जून रोजीच न्यायालयाने दोषी ठरवले होते. आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

अमेरिकन नागरिकांची कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे प्रकरण गेल्या वर्षी उघडकीस आले होते. याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयात सुनावणी सुरु होती. अमेरिकेत राहणारा आणि याप्रकरणातील आरोपी हार्दिक पटेलसह अन्य आरोपींनी न्यायालयात गुन्ह्याची कबूली दिली. हार्दिक पटेल हा भारतातील कॉल सेंटरचे दैनंदिन कामकाज बघत होता. यासाठी तो भारतातील त्याच्या साथीदारांशी समन्वय साधण्याचे काम करत होता असे त्याने न्यायालयात सांगितले. न्यायालयाने कॉल सेंटर घोटाळ्यातील आरोपींना दोषी ठरवले आहे. या सर्वांना शिक्षा कधी सुनावली जाईल हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे किंवा ज्यांनी कर भरलेला नाही अशा अमेरिकन लोकांना कॉल सेंटरमधून कॉल जात असे. हा कॉल अमेरिकन सरकारकडून आला असल्याचे त्यांना भासवले जात असे. ताबडतोब आम्ही सांगतो तितकी रक्कम भरा अथवा तुम्हाला अटक केली जाईल अशी धमकी त्यांना दिली जात असे. या माध्यमातून त्यांनी ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावले होते.