व्यवस्थेमध्ये शिस्तीला प्राधान्य द्यायला हवे. मात्र, शिस्त पाळण्याबाबत बोलायला गेलं की आजकल लोक ‘हुकूमशहा’ म्हणून कलंकीत करतात, अशी खंत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. रविवारी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या ‘मुव्हिंग ऑन मुव्हिंग फॉरवर्ड’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार मांडताना मोदींनी नायडूंच्या शिस्तप्रिय कार्यशैलीचा उल्लेख केला. ध्येयपूर्तीसाठी नियमबद्ध कार्यप्रणाली अनिवार्य असून व्यवस्था आणि व्यक्ती या दोघांसाठी हा गुण लाभदायक ठरतो, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.


नायडू यांच्या उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापतीपदाची वर्षपूर्ती झाली आहे. या काळातील आपल्या अनुभवांचे त्यांनी सचित्र संकलन करुन एक ‘कॉफी टेबल बुक’ तयार केले असून त्याचे आज प्रकाशन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वैंकय्य नायडू यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे यावेळी उपस्थित होते.

पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर मोदी म्हणाले, वैंकय्याजी शिस्तीच्या बाबतीत खूपच आग्रही आहेत. मात्र, आपल्या देशातील स्थिती सध्या अशी झाली आहे की शिस्तीला लोकशाहीविरोधी ठरवले जात आहे. शिस्तीचा कोणी जरा देखील आग्रह केला की लोक त्याला हुकूमशाह म्हणून संबोधत आहेत.

दरम्यान, मोदींना नायडूंना स्वभावाने शेतकरी असे संबोधले. ते म्हणाले, नायडूंच्या डोक्यात कायमच आपल्या देशातील गावं, शेतकरी आणि कृषीसंबंधी गोष्टीचं घोळत असतात. याचे चांगले उदाहऱण सांगायचे झाल्यास नायडू यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये स्वतःला ग्रामीण विकास मंत्रालय देण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे खातं मिळाल्यानंतर गावांना शहरांशी जोडणाऱ्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना त्यांनी तयार केली. त्यामुळे या योजनेचे श्रेय वैंकय्या नायडू यांनाच जाते. यावेळी मनमोहन सिंग म्हणाले, उपराष्ट्रपती नायडू यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभावाची झलक त्यांच्या एक वर्षाच्या कामातून दिसून येत आहे.

लोक शेती व्यवसायातून दुसरीकडे वळताहेत हा देशासमोरील एक गंभीर प्रश्न बनला असून यासंदर्भात बोलताना नायडू म्हणाले, सध्याच्या काळात सरकारकडून कृषीक्षेत्राकडे पक्षपातीपणे पाहिले जात आहे. कृषीक्षेत्राला टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. इकडे अर्थमंत्रीही उपस्थित आहेत, कदाचित मी जे काय बोलतोय हे त्यांना आवडणार नाही. मात्र, त्यांनी सर्वच क्षेत्रांची काळजी घ्यायला हवी. शेतीकडे पक्षपातीपणे पाहू नये अन्यथा यात फायदा नसल्याने लोक शेतीक्षेत्राकडे दुर्लक्ष करतील.