सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत.. कुठेही, कोणत्याही खटल्याचे कामकाज सुरू असताना फिर्यादी व आरोपी असे दोन्ही पक्षांचे वकील युक्तिवाद करताना न्यायासनावर बसलेल्या न्यायाधीशांना माय लॉर्ड, युवर लॉर्डशिप, युअर ऑनर असे संबोधतात. तसा प्रघातच आहे. परंतु न्यायाधीशांना असे आत्यंतिक आदराने संबोधलेच पाहिजे असा कुठे काही नियम नसून, न्यायाधीशांचा फक्त आदराने उल्लेख केला तरी चालेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायाधीशांना माय लॉर्ड व युअर ऑनर वगैरे संबोधणे म्हणजे एक प्रकारची गुलामगिरीच असून अशी प्रथा सरसकट बंदच केली पाहिजे, अशी मागणी करणारी याचिका येथील ७५ वर्षीय वकील शिवसागर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एच. एल. दत्तू आणि एस. ए. बोबडे यांनी वरीलप्रमाणे निर्वाळा देत याचिकेवर अधिक सुनावणी करण्यास नकार दिला.
बार कौन्सिलचा नियम
भारतीय बार कौन्सिलने २००६ मध्ये वकिलांसाठी आचारसंहिता तयार केली असून, त्यात न्यायाधीशांना माय लॉर्ड किंवा युअर ऑनर संबोधलेच गेले पाहिजे, असे काही बंधनकारक करण्यात आलेले नाही. तसेच न्यायालयात वकिलांकडून ठरावीक पेहेरावच अपेक्षित असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

आम्हाला माय लॉर्ड, युवर लॉर्डशिप, युअर ऑनर किंवा तत्सम उपाधी लावून युक्तिवाद करा असा काही दंडक नाही. वकीलवर्गाने केवळ आम्हाला सर, साहेब किंवा न्यायमूर्ती महोदय असे संबोधले तरी आम्हाला चालणार आहे. माय लॉर्ड किंवा युअर ऑनर म्हणणे काही अनिवार्य नाही. फक्त न्यायासनाचा आदर राखला गेला पाहिजे, एवढेच आमचे म्हणणे आहे. त्यातूनही न्यायाधीशांना माय लॉर्ड किंवा युअर ऑनर म्हणायचे की नसुते साहेब, सर म्हणायचे हा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यावर आमचे बंधन नाही.   – सर्वोच्च न्यायालय