केंब्रिज अॅनालिटीका (इंग्रजी मध्ये CA) ची कथा एका जेम्स बॉण्ड च्या चित्रपटापेक्षाही गूढ, रहस्यमय (आणि हिंसेने भरलेली) होऊ लागली आहे.

स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाखाली CA ची पालक कंपनी स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज भारतात काम करीत होती. अवनिश राय या चारपैकी एका संचालक महाशयांनी काही मुलाखती दिल्या आहेत आणि ती माहिती एका सस्पेन्स थ्रिलर साठी उत्कृष्ट पटकथा ठरू शकेल.

अवनिश राय यांना डॅन मुरेसन नामक रोमानियन नागरिक भेटला साधारण २००९ नंतर. राय यांनी त्या निवडणुकीत सध्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्यासाठी काम केले होते आणि जिंकण्याची पूर्ण खात्री असूनही ते हरले यामुळे राय बुचकळ्यात होते. तेव्हा या मुरेसन ने त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवून पराभवाची कारणे अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करून समजावून सांगितली ज्या पद्धतीने राय अत्यंत प्रभावित झाला. मानस शास्त्रीय, सामजिक आणि राजकीय विश्लेषणाची ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरणार याची खात्री त्याला पटली होती.

त्यातून पुढे त्यांची ओळख अलेक्झांडर निक्सशी ची ओळख झाली. पैसे कमावणे हा एकमेव उद्देश घेऊन हे महोदय भारतात आले होते. 2014 डोळ्यापुढे ठेवून काम सुरू झाले आणि बिहार निवडणुकांमध्ये कोणतेही काम केलेले नसताना (राय याने वैयक्तिक 27 जागांवर काम केले असा त्याचा दावा आहे) कंपनी प्रोफाइल मोठी दिसावी म्हणून ते अॅड करण्यात आले.

निक्स च्या मते काँग्रेस सत्तेवर असल्याने पैसे त्यांच्याकडेच असणार आणि आपण आपल्या कामाचे प्रेझेंटेशन त्यांना द्यायला हवे.काँग्रेसला ते प्रेझेंटेशन आवडले होते मात्र पुढे काहीच झाले नाही. राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी निक्स याने अमेठी, रायबरेली, जयपूर (ग्रामीण) आणि मधुबनी या चार लोकसभा जागांचे काम गिफ्ट म्हणून करून देऊ असे काँग्रेस व रायला सांगितले.

येथून सुरू झाली गडबड..

काम करताना राय बुचकळ्यात पडले की मतदारांना काँग्रेस बड्डल नकारात्मक प्रश्न का विचारले जात आहेत? जर काम काँग्रेस चे करायचे असेल तर पक्षाच्या बाजूने प्रचार करायला हवा. मग हे चाललय काय?

एके दिवशी एक अमेरिकन – गुजराती महिला रायच्या ऑफिस मध्ये आली आणि डेटा अॅनालिसिस बघू लागली. जेव्हा तिला विचारणा केली तेव्हा ती म्हणाली की मी क्लायंटकडून आले आहे. रायच्या डोक्यात प्रकाश पडला की खरा क्लायंट कोणी वेगळाच आहे आणि जो आहे तो काँग्रेस विरोधी आहे. रायने नीक्स ला असं डबल गेम न करण्याबाबत बजावले मात्र त्यावर ‘मला फक्त पैसे हवेत’ हे उत्तर त्याला मिळाले.

नैसर्गिक मृत्यू की खून?

मुरेसन आणि मंडळी भारतासोबत केनिया मध्येही हेच काम करीत होती आणि त्यांनी तेथे उहरू केनयाटा या उमेदवाराला प्रधानमंत्री करण्यात मोठी भूमिका बजावली होती. अचानक एके दिवशी मुरेसन याचा मृतदेह केनिया मध्ये सापडला. हृदयविकाराचा झटका हे जरी अधिकृत कारण देण्यात आले तरी भारतासारखाच डबल गेम त्याने तेथेही केला असावा असा संशय आहे आणि त्याचेच बक्षीस त्याला मिळाले असे बोलले जाते.

तोपर्यंत भारतवरून निक्सचे लक्ष उडून अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणुकीवर गेले होते कारण तेथे अधिक पैसा होता. २०१४ भारतीय निवडणुकीत त्यांनी काही रोल प्ले केला की नाही याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. किंबहुना काँग्रेस हरावी म्हणून गुप्तपणे काम करणारा अमेरिकेतील कोण उद्योगपती होता याबाबतही काही उघड झालेले नाही. मात्र हे एक असे रहस्य आहे जे उघड झाल्यास भारतीय राजकारणात त्याचे फार दूरगामी परिणाम दिसू शकतात.

ता.क.- आता कोण आले मुरेसन नंतर? तो होता ख्रिस्तोफर वायली नावाचा तरुण. अमेरिकन निवडणुकात CA आणि फेसबुक मार्फत जी संशयास्पद भूमिका बजावली गेली त्याचा भांडाफोड करणारा हाच तो तरुण.

(दी हिंदू वृत्तपत्राचे प्रिन्सिपल कॉरस्पॉडंट असलेल्या आलोक देशपांडे यांच्या फेसबुक पेजवरून साभार)