डेटा लीक प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या ब्रिटन कंपनी केम्ब्रिज अॅनालिटीकाने २०१९ निवडणुकीसाठी काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवला होता अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, केम्ब्रिज अॅनालिटीकाने फेसबूक आणि ट्विट्समधील डेटा चोरी करत २०१९ निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतो असा दावा काँग्रेससमोर ठेवलेल्या प्रस्तावात केला होता. या कॅम्पेसनाठी काँग्रेसला २.५ कोटींचा खर्च येईल असंही सांगण्यात आलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने बैठक पार पडली मात्र कंपनीसोबत कोणताही करार करण्यात आला नाही अशी माहिती दिली आहे.

‘एखाद्या कंपनीकडून व्यवसायिक प्रस्ताव आला याचा अर्थ आपोआप लगेच संबंधित कंपनी आणि ग्राहकात नातं निर्माण झालं असा होत नाही’, असं काँग्रेसच्या डेटा अॅनालिटिक्स विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे. गतवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान केम्ब्रिज अॅनालिटीकाने हा प्रस्ताव मांडला होता. ऑगस्ट २०१७ मध्ये मांडण्यात आलेल्या ५० पानांच्या या प्रस्तावाला ‘डेटा ड्रिव्हन कॅम्पेन | द पाथ २०१९ लोकसभा’ असं नाव देण्यात आलं होतं.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केम्ब्रिज अॅनालिटीकाचे सीईओ अॅलेक्झांडर निक्स ज्यांना निलंबित करण्यात आलं आहे, त्यांनी काँग्रेससमोर हा प्रस्ताव मांडला होता. राहुल गांधींकडे पक्षाचं उपाध्यक्षपद असताना त्यांनी भेट घेतली होती. यावेळी राहुल गांधींसोबत पी चिदंबरम आणि जयराम रमेशही उपस्थित होते.

प्रस्तावात या कॅम्पेनसाठी २.५ कोटींचं बजेट मांडण्यात आलं होतं. केम्ब्रिज अॅनालिटीकाने फेसबूक पोस्ट आणि ट्विटच्या माध्यमातून डेटा चोरी करत निवडणुकीचा कल तुमच्या बाजूने येईल तसंच मतदारांना प्रभावित करु असा दावा केला होता. या भेटीत मात्र काहीच निर्णय झाला नव्हता. दोन महिन्यांनी राहुल गांधींना पक्षाचं अध्यक्षपद मिळालं.

केम्ब्रिज अॅनालिटीकाचा हा प्रस्ताव काँग्रेसने मात्र फेटाळून लावला. केम्ब्रिज अॅनालिटीका काँग्रेसमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल अशी शंका असल्या कारणानेच काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळून लावला असल्याची माहिती आहे.

फेसबुकच्या ७.८ कोटी युजर्सचा डेटा चोरी केल्याने केम्ब्रिज अॅनालिटीका कंपनी चर्चेत आली आहे. यावेळी त्यांनी भारतात होणा-या २०१९ निवडणुकीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही झाला होता. फेसबूक सीईओ मार्क झुकेरबर्गने मात्र आपण निवडणुकीवर प्रभाव पडणार नाही यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान भाजपाने काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली आहे.