तिबेट चीनचा अविभाज्य भाग असून स्वतंत्र तिबेटला आपला पाठिंबा नसल्याचे इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी गुरुवारी स्पष्ट केले. गेल्या वर्षी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेतल्यामुळे चीनने संताप व्यक्त केला होता. या वर्षांच्या अखेरीस कॅमेरॉन चीनच्या भेटीवर जाणार आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांनी इंग्लंडची भूमिका मांडली. ब्रिटिश संसदेसमोर ते म्हणाले की, इंग्लड चीनच्या सार्वभौमत्वाचा आदर करते.  
मे २०१२मध्ये कॅमेरॉन यांनी दलाई लामा यांची भेट घेतल्यानंतर चीनने नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीचा कॅमेरॉन यांच्या वर्षांअखेरीस होणाऱ्या चीन दौऱ्यावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून इंग्लंडने हे स्पष्टीकरण दिल्याचे मात्र अधिकाऱ्यांनी नाकारले.
इतर देशांचे नेते दलाई लामा यांची भेट घेऊन चीनच्या विभागणीला आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देतात, असा चीनचा आरोप आहे. यावर पंतप्रधान कॅमेरॉन यांनी स्पष्ट केले की, चीन आणि तिबेटबद्दल इंग्लंडच्या पूर्वीपासून चालत आलेल्या धोरणात कोणताही बदल झाला नसून तिबेटला आम्ही चीनचाच भाग मानतो.