नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपची भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून अडवणूक करण्यासाठी डाव्या पक्षांनी भाजपविरोधात मोहीम उघडली आहे.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एस. सुधाकर रेड्डी म्हणाले की, सर्व डाव्या पक्षांच्या नेत्यांचे अधिवेशन ७ सप्टेंबर रोजी पटना येथे आयोजित करण्यात आले आहे. भाजपला भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून विरोध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात संसदेत गदारोळ घालणाऱ्या खासदारांविरोधात भाजपने मोहीम उघडण्याची नुकतीच घोषणा केली आहे. विरोधी पक्षांच्या गोंधळामुळेच संसदेचे पावसाळी अधिवेशन वाया गेल्याचे भाजपने म्हटले आहे. रेड्डी म्हणाले की, भाजपला विरोध करण्यासाठी आम्ही पुढील महिन्यात डाव्या नेत्यांच्या उपस्थितीत मोहीम राबविणार आहोत. लोकसभा निवडणुकीत भाजपने बिहारमध्ये ४० पैकी ३१ जागांवर विजय मिळविला होता. तर उत्तर प्रदेशातही भाजपने ८० पैकी ७१ जागांवर बाजी मारली होती. रेड्डी म्हणाले की, भाजपचा जनतेची फसवणूक करणारा खरा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष लोकांना भेटणार आहोत.