पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भाजपाला २०१९च्या निवडणुकांमध्ये रोखण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येणार असल्याच्या हालचाली यापूर्वीच सुरु झाल्या आहेत. बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त या सर्व विरोधकांनी आवर्जुन हजेरी लावली. दरम्यान, सर्वजण एकाच व्यासपीठावर असताना उत्साही दिसत होते. एकाच व्यासपीठावर एकत्र येत त्यांनी हात उंचावून कर्नाटकच्या जनतेसह संपूर्ण देशातील जनतेला अभिवादन केले. यावरुन त्यांनी २०१९च्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचेच संकेत दिल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

जेडीएसचे नेते एच. डी. कुमार स्वामी यांनी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची तर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, बसपा सुप्रीमो मायावती, तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, सीपीएमचे नेते सिताराम येचुरी, जनता दल युनायटेडचे नेते शरद यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव अशा दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. केंद्रात विरोधी पक्षात असलेले हे सर्व नेते यानिमित्त एकत्र आले होते.

या सोहळ्यादरम्यान, राजकीय व्यसपीठांवर एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या मायावती आणि सोनिया गांधी यांनी एकमेकांची गळाभेट घेत हसून एकमेकांशी संवाद साधला. तसेच राहुल गांधी, अखिलेश यादव आणि सिताराम येचुरी यांनी एकमेकांना माध्यमांसमोर एकत्र छायाचित्रे काढून घेण्यासाठी बोलावून घेतले. दरम्यान, बिहारमध्ये भाजपामुळे सत्ता गमावलेले लालू पुत्र तेजस्वी यादव तसेच त्यांचे समर्थक शरद यादव यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.