कॅनडाच्या स्नोबडर्स या एलिट एअर फोर्स एरोबॅटिक्स टीमचे एक विमान रविवारी ब्रिटिश कोलंबिया प्रांतामध्ये कोसळले. करोना व्हायरस विरोधात लढणाऱ्या जनतेला, कोविड योद्ध्यांना सलामी देण्यासाठी म्हणून एअर फोर्सकडून हवाई प्रात्यक्षिक सुरु असताना ही दुर्घटना घडली अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कामलूपस एअरपोर्टवरुन उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एक विमान घरासमोरच्या अंगणात कोसळले.

विमान कोसळण्याआधी वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून बाहेर पडला व एका घराच्या छतावर उतरला. त्याच्या पाठिला आणि मानेला मार लागला आहे असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. खाली कोसळताच या विमानाने पेट घेतला. घरासमोरुन धुराचे लोट येताना फोटोमध्ये दिसत आहेत.

या दुर्घटनेनंतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. कोणी बॉम्ब टाकला की, काय असे आम्हाला वाटले असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.