भारतासारख्या देशात कधी शासकीय कर्मचारी तर कधी आणखी कोणी वेतनवाढीसारख्या मागण्यांसाठी आंदोलन किंवा संप करणे नवीन नाही. पण कॅनडात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. वेतनवाढ झाल्यामुळे येथील डॉक्टरांनी आंदोलन केले आहे. मेडिकल फेडरेशनकडून केलेल्या वेतनवाढीला ५०० डॉक्टरांनी विरोध दर्शवला आहे. याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे या डॉक्टरांनी वेतनवाढीविरोधात ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी वेतनवाढ करण्यापेक्षा तो पैसा आरोग्य सेवेसाठी वापरा असे म्हटले आहे. त्यामुळे आपल्या पगारापेक्षा देशाच्या आरोग्यासाठी झटणारे हे डॉक्टर खऱ्या अर्थाने आदर्श आहेत असेच म्हणावे लागेल.

क्यूबिकमधील ५०० डॉक्टर या मागणासाठी एकत्र आले असून त्यांनी सरकारने केलेल्या वेतनवाढीला विरोध केला आहे. ‘आम्ही क्यूबिकचे डॉक्टर, आमच्या मेडिकल फेडरेशनकडून केलेल्या वेतनवाढीला आमचा विरोध आहे. आमची वेतनवाढ करण्यापेक्षा आरोग्यसेवा अधिक चांगली कशी होईल यासाठी त्या पैशांचा वापर करावा, असे आम्हाला वाटतंय. असं या याचिकेत म्हटले आहे. आमच्यासोबत काम करणाऱ्या इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची स्थिती चांगली नाही. तसेच आरोग्यसेवेबाबत रुग्णही म्हणावे तेवढे समाधानी नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणून आमचा पगार वाढवणे आम्हाला योग्य वाटत नाही असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांसाठी रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पैशांपेक्षा कितीतरी अधिक आनंद देणारा असतो असेही या डॉक्टरांनी म्हटले आहे.

या आंदोलनामध्ये जनरल प्रॅक्टीशनर, विशेषज्ज्ञ, निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा समावेश आहे. डॉक्टरांनी घेतलेल्या निर्णयावर आरोग्यमंत्री गेटन बारेटे यांनी आनंद व्यक्त केला आहे. डॉक्टरांना सरकारने दिलेली वेतनवाढ नको असेल, तर त्या पैशांचा चांगल्या कामासाठी वापर करू, असं आश्वासन मी डॉक्टरांना देतो, असे बारेटे यांनी सांगितले आहे.