करोनामुळे लॉकडाउन लागला आणि संपूर्ण जगाने वर्क फ्रॉम होमचा स्वीकार केला. एरव्ही बंद खोलीत होणाऱ्या बैठका ऑनलाइन होऊ लागल्या. एकीकडे याचा फायदा असताना काही तोटेही असून अशा अनेक घटना समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार कॅनडात घडला असून तेथील एका खासदाराला लाजिरवाण्या प्रकाराला सामोरं जावं लागलं आहे. व्हिडीओ मीटिंगदरम्यान चुकून लॅपटॉपचा कॅमेरा ऑन झाल्याने कॅनडाचे खासदार विल्यिअम एमस चक्क नग्नावस्थेत दिसले.

संसदेतील सदस्यांसोबत असणाऱ्या झूम कॉलवर विल्यिअम एमस सहभागी होणार होते. यावेळी विल्यिअम एमस सदस्स्यांना संबोधित करणार होते. मात्र बैठकीआधीच लॅपटॉपचा कॅमेरा ऑन झाला आणि विल्यिअम एमस नग्नावस्थेत दिसल्याने इतर सदस्यांना धक्का बसला. हे फीड फक्त कॅनेडियन संसदेच्या फीडवर प्रसारित करण्यात आल्याने सुदैवाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं नाही.

ही घटना सार्वजनिक झाल्यानंतर विल्यिअम यांनी नंतर ट्विट करत याप्रकरणी माफीदेखील मागितली. “मी आज खूप मोठी चूक केली आणि नक्कीच त्यामुळे मला लाज वाटतीये,” असं विल्यिअम यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, “मी जॉगिंगवरुन आल्यानंतर ऑफिसचे कपडे घालत असताना कॅमेरा चुकून चालू राहिला. सभागृहातील माझ्या सर्व सहकाऱ्यांची मी माफी मागतो. हे चुकून झालं असून यापुढे होणार नाही”.

विल्यिअम एमस यांच्यावर नियमानुसार कारवाईची शक्यता आहे. बैठकीदरम्यान खासदारांना कोणत्याही ड्रेस कोडचं बंधन नाही. परंतू पुरुषांना जॅकेट, शर्ट, टाय वैगेरे घालणं अपेक्षित आहे. विल्यिअम एमस यांच्या लिबरल पक्षाचे प्रमुख असणारे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी अद्याप यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही.

दरम्यान विरोधी पक्षाने हा मुद्दा उपस्थित केला आहे. “सदस्यांना, विशेषत: पुरुषांना हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की जॅकेट, टाय अनिवार्य आहे. तसंच शर्ट, बॉक्सर शॉर्ट्स किंवा पँटदेखील. सदस्यांना पुन्हा एकदा काळजी घेण्याची आणि कॅमेरा योग्य प्रकारे नियंत्रित करण्याची आठवण करून दिली पाहिजे असं वाटतंय,” असं विरोधी पक्षाने म्हटलं असल्याचं वृत्त कॅनडाच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.