कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या स्नेहभोजन समारंभात दोषी खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रित केल्याने वाद निर्माण झाला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्रुडोंवर नेम साधला. धर्माचा वापर राजकीय उद्देशाने करुन विभाजनाची दरी  निर्माण करणाऱ्यांना थारा द्यायला नको. देशाच्या एकात्मतेला आव्हान देण्याचा प्रयत्न कधीच सहन करणार नाही, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारत दौऱ्यावर असून शुक्रवारी त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. यात दोन्ही देशांमध्ये सहा करार झाले. या चर्चेनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.  संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत आम्ही चर्चा केली. दहशतवाद व कट्टरतावाद हे प्रमुख आव्हान असून याविरोधात लढा देण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. कॅनडाशी सहकार्य वाढवण्यावर भारत भर देत असून दोन्ही देशांमधील संबंध हे लोकशाही, सर्वश्रेष्ठ कायदा यावर आधारित आहे, असे मोदींनी नमूद केले.

भारतातून उच्च शिक्षणासाठी कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आआहे. देशातील १ लाख २० हजार विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षणासाठी आम्ही कॅनडाशी करार केला आहे, असे त्यांनी सांगितले. उत्तर कोरिया आणि मालदीव या देशांबाबत दोन्ही देशांची समान भूमिका आहे, असेही त्यांनी नमूद केले. कॅनडा सुपरपॉवर असून उर्जाक्षेत्रात कॅनडाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींनी ट्रुडो यांन खलिस्तानवरुन चिमटेही काढले. विभाजनाची दरी निर्माण करणाऱ्यांना थारा द्यायला नको, असे सांगत मोदींनी ट्रुडो यांच्यावर निशाणा साधला. ट्र्डो यांनी या दौऱ्यातील मानपान व प्रतिसादासठी भारतीयांचे आभार मानले.