कॅनेडियन कंपनीला आर्थिक फायदा
चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरात हवा प्रदूषण वाढल्याने आता हवा विकत घेण्याची वेळ आली असून त्याचा फायदा घेत कॅनडाच्या कंपनीने शुद्ध हवेची एक बाटली २८ डॉलर्सना विकायला ठेवली आहे. यात पर्वतावरील शुद्ध हवा या बाटल्यांमधून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या शुद्ध हवेच्या बाटल्यांना चांगली मागणी आहे. आतापर्यंत पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या जात होत्या, मात्र आता तर प्रदूषणामुळे शुद्ध हवाही विकत घेण्याची वेळ आली. बीजिंगमध्ये नेहमीप्रमाणे यावर्षीही डिसेंबरमध्ये काळ्या धुक्याबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला होता. लोकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला सरकारनेच जारी केला होता.
शाऴा बंद ठेवण्यात आल्या होत्या तसेच बांधकामांवरही र्निबध घातले होते. शांघायमध्येही मोठय़ा प्रमाणात हवा प्रदूषण असून शाळांच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. कारखान्यांनाही उत्पादनांवर मर्यादा घालावी लागली आहे. या पाश्र्वभूमीवर चीनमध्ये व्हायटॅलिटी एअर या कंपनीच्या हवेच्या बाटल्यांच्या उत्पादनाला मोठी मागणी आहे. कॅनडातील बँफ अँड लेक लुईस या भागातून ही हवा बाटलीबंद करण्यात आली आहे. हवेच्या या बाटल्या चीनच्या बाजारपेठेत विकल्या जात असून ऑक्सिजनच्या एका बाटलीची किंमत २७.९९ डॉलर्स आहे तर बँफ येथील हवेच्या बाटलीची किंमत २३.९९ डॉलर्स आहे. व्हायटॅलिटी एअरचे चीनमधील प्रतिनिधी हॅरिसन वँग यांनी सांगितले की, चीनमधील ताओबाओ संकेतस्थळावर व इ बे ऑनलाईन विक्री केंद्रात या बाटल्या विक्रीस पाठवल्यानंतर लगेच संपल्या आहेत. कंपनीने हवेच्या बाटल्यांची जाहिरात चीनमध्ये दोन महिन्यांपासून सुरू केली होती पण हवेच्या पहिल्या पाचशे बाटल्या विकल्या गेल्या आहेत. आता आणखी ७०० बाटल्या उपलब्ध केल्या जात आहेत. चीनमधील लोकांना शुद्ध हवा मिळावी असा आमचा प्रयत्न आहे असे वँग यांनी सांगितले. यामुळे प्रदूषणावर काही अंशी मात करता येईल व लोकांमधील आरोग्याचे प्रश्न कमी होतील. झांगीयागँग येथे रेस्टॉरंटमध्ये हवेच्या बाटल्या विकल्या जात आहेत. काही हॉटेल्समध्ये हवा स्वच्छ करणारी यंत्रे असताना त्याचीही किंमत बिलात लावली जात असून वर हवेच्या बाटल्याही खरेदी करायला लावल्या जात आहेत.