महिलांच्या गर्भाशयात चुकीचे वीर्य सोडून गर्भधारणा घडवून आणणाऱ्या एका कॅनडीयन डॉक्टरचा परवाना मंगळवारी रद्द करण्यात आला. बनार्ड नॉरमॅन बारवीन असे या डॉक्टरचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या गर्भाशयात चुकीचे वीर्य सोडून ५० ते १०० बाळांचा जन्म घडवून आणल्याचा बारवीनवर आरोप आहे.

या प्रकरणी त्याच्याविरोधात न्यायालयीन खटला सुरु आहे. ११ प्रकरणांमध्ये त्याने स्वत:च्या वीर्याचा वापर केला. आपल्या रुग्णांचा विश्वासघात करुन न भरुन येणारे नुकसान केल्याबद्दल बनार्ड नॉरमॅन बारवीनला १० हजार अमेरिकन डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे. डॉ. बारवीनचे वर्तन धक्कादायक आणि तितकेच निंदनीय आहे असे ओनतारीयोच्या फिजिशियन अँड सर्जन कॉलेजच्या शिस्तपालन समितीने म्हटले आहे.

तीन महिलांमध्ये चुकीचे वीर्य सोडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टर बारवीनवर कारवाई झाल्याने त्याला वैद्यकीय परवाना सोडावा लागला होता. त्यामुळे २०१४ सालापासूनच त्याची वैद्यकीय प्रॅक्टीस बंद आहे. डॉक्टर बारवीनच्या क्लिनिकमधून जन्मलेल्या एका बाळाची जनुकीय पार्श्वभूमी तपासल्यानंतर हा खुलासा झाला.

डॉक्टर बारवीनच्या क्लिनिकमधून जन्मलेल्या एका बाळाला सेलिअ‍ॅक हा आजार होता. हा जनुकीय आजार आहे. बाळाच्या आई-वडिलांना हा आजार नव्हता. त्यावेळी डॉक्टर बारवीनने चुकीच्या वीर्याचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. रिबेका डिक्सन या १९८९ मध्ये जन्मलेल्या मुलीला वयाच्या २५ व्या वर्षी तिचे जैविक पिता बारवीन असल्याचे समजले.