‘इबोला’सारख्या प्राणघातक रोगाचे निदान करणारी वेगवान, सोपी आणि किफायतशीर चाचणी इंग्लंडमधील संशोधकांनी विकसित केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आफ्रिकेत धुमाकूळ घालणाऱ्या ‘इबोला’चा भविष्यात नि:पात करण्यासाठी या चाचणीची मोठी मदत मिळेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
‘इबोला’संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठी किफायतशीर आणि वापरण्यासाठी सोपी पद्धती विकसित करण्यावर तज्ज्ञांनी कंबर कसली आहे. ‘प्रायमरडिझाइन’ या इंग्लंडमधील उच्च तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपनीने ही चाचणी विकसित केली आहे.
‘इबोला’चा प्रसार रोखण्यासाठी त्यावर अचूक निदान होणे आवश्यक आहे. त्यासाठी देशात आणि देशाबाहेर प्रवास करणाऱ्या संशयित रुग्णांवर ही चाचणी वेगवान पद्धतीने होणे आवश्यक आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जिम विक्स यांनी स्पष्ट केले.आमची चाचणी वेगवान, किफायतशीर आणि सोपी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 एका मिनिटातही संशयित रुग्णाच्या शरीरात ‘इबोला’चे विषाणू आहेत का, याचा शोध घेण्याची क्षमता या चाचणीत आहे. इबोलाचा संसर्ग झाला की नाही, याची प्राथमिक अवस्था शोधण्यासाठी ही चाचणी अतिशय उपयुक्त ठरेल, असे संशोधकांनी म्हटले आहे. त्यामुळे पश्चिम आफ्रिकेतील इबोलाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी ही चाचणी शक्य तितक्या लवकर करता येईल. तशी विनंती आपण जागतिक आरोग्य संघटनेकडे केल्याचे ‘प्रीमियर डिझाइन’ कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

काय आहे चाचणी
इबोलाच्या विषाणूमध्ये विशेष जनुकीय ठसे असतात. जे मानवातही आढळतात. मानवात हे जनुकीय ठसे गुणसूत्रांमध्ये निश्चित केले जातात. परंतु इबोलाचा विषाणू यासाठी आरएनएचा वापर करतो. म्हणूनच विषाणूमधील आरएनए शोधण्यासाठी तसे ‘किट’ तयार करण्यात आले आहे. या चाचणीमधून इबोला विषाणूतील ‘आरएनए’ मानवाच्या डीएनएमध्ये सापडला तर तो रुग्ण इबोलाग्रस्त आहे, असे निश्चित करून त्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.  

नव्या चाचणीची कल्पना
न्यूयॉर्क : इबोलाचा फैलाव हा अत्यंत वेगाने होत असल्यामुळे त्याची लागण शोधण्याचे आणि त्याला पायबंद घालण्याचे उपायही तितकेच वेगवान आणि अभिनव असले पाहिजेत, असे मत पुलित्झर पुरस्कार विजेते कर्करोग शल्यविशारद सिद्धार्थ मुखर्जी यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या संपादकीय पानावरील लेखात नमूद केले आहे. आजवर इबोला रोखण्यासाठी तीन उपाय योजले जातात. इबोलाचा फैलाव झालेल्या देशांतून पर्यटकांच्या येण्यावर र्निबध घालणे, अशा प्रवाशांची कसून वैद्यकीय तपासणी करणे आणि या प्रवाशांना वैद्यकीय निगराणीखाली स्वतंत्र ठेवणे, असे तीन उपाय योजले जातात. मुखर्जी यांनी चौथा उपाय सुचविला आहे तो रासायनिक चाचणीचा. इबोलाची लक्षणे दिसू लागण्याआधीच पीसीआर (पॉलिमिरेज चेन रिअ‍ॅक्शन) चाचणीद्वारे रासायनिक परिणामांद्वारे रक्तांतील या साथीचे विषाणू शोधता येतील, असा अभिनव उपायही त्यांनी या लेखात सुचविला आहे.रक्ताच्या कर्करोगावर उपचार करताना गेले दशकभर आपण रुग्णातील अनेक विषाणूसंसर्ग शोधणारे नवनवे उपाय विकसित केले आहेत. इबोलाच्या या चाचणीसाठी रुग्णाचे चमचाभर रक्त केवळ घ्यावे लागेल आणि काही तासांत या चाचणीचा निष्कर्ष हाती येऊ शकेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. या ‘पीसीआर’ चाचणीची प्रथम कल्पना आपण २००० साली ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात मांडली होती, असेही त्यांनी या लेखात म्हटले आहे.

आकडेवारी
४,०३३ : लोक जगभरात इबोलामुळे मृत्युमुखी  
१०,००० : गेल्या दोन महिन्यांत दर आठवडय़ाला बाधितांची संख्या