एलईडी दिव्यांमुळे वीजबचत होत असली, तरी जाहिरात फलक, व्यावसायिक जाहिराती तसेच घरातही वापरल्या जाणाऱ्या या दिव्यामुळे स्तनाच्या व पुरस्थ ग्रंथीच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे संशोधनात दिसून आले आहे.

बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ व युनिव्हर्सिटी ऑफ एक्सटर या ब्रिटनमधील दोन संस्थांनी केलेल्या संशोधनानुसार निळा प्रकाश रात्री मोठय़ा प्रमाणावर राहिला तर पुरस्थ ग्रंथीचा धोका दुपटीने तर स्तनाच्या कर्करोगाचा धोका दीडपटीने वाढतो. जे लोक जास्त काळ निळ्या प्रकाशात राहत नाहीत, त्यांच्यापेक्षा निळ्या प्रकाशात राहणाऱ्या लोकांना असे कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वीच्या काळातील दिवे पिवळसर नारिंगी रंगाचा प्रकाश देत असत. आताचे एलईडी दिवे निळ्या रंगाचा प्रकाश देतात. निळ्या रंगाच्या प्रकाशात जास्त काळ राहिल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. जे लोक खिडक्या असलेल्या व अंधाऱ्या खोल्यात राहतात, त्यांना कर्करोगाचा धोका कमी असतो.

एनव्हरॉनमेंटल हेल्थ परस्पेक्टिव्ह या नियतकालिकात प्रसिद्ध संशोधनानुसार २० ते ८५ वयोगाटातील ११ स्पॅनिश भागात राहणाऱ्या ४ हजार लोकांची आरोग्य व इतर माहिती घेऊन हे विश्लेषण करण्यात आले. घरातील निळ्या प्रकाशात राहण्याच्या वेळाची नोंदही व्यक्तिगत प्रश्नावलीतून घेण्यात आली. रात्रीच्या बाहेरील दिव्यांची नोंद आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून घेण्यात आलेल्या प्रतिमांच्या आधारे करण्यात आली. एक्सटर विद्यापीठाचे अलेजांद्रो सँचेझ दा मिग्वेल यांनी सांगितले, की दिवसा प्रकाश व रात्री अंधार याची माणसाला सवय झालेली आहे. आता शहरांमध्ये जुनी प्रकाश व्यवस्था बदलली असून निळा प्रकाश देणारे एलईडी आले आहेत. त्यामुळे जैविक घडय़ाळ बिघडू शकते. रात्रीच्या वेळी मोबाइल व टॅबलेटमधून बाहेर पडणारा निळा प्रकाशही असाच परिणाम करतो की नाही याचे संशोधन होण्याची गरज आहे.

स्तनाच्या व पुरस्थ ग्रंथीच्या कर्करोगात पर्यावरणीय घटक कितपत कारणीभूत असतात, याचा फार कमी अभ्यास झाला आहे. एलईडी दिवे हे शरीराचे चोवीस तासाचे जैविक चक्र विस्कटून टाकतात. त्यामुळे संप्रेरकांवर परिणाम होतो. स्तनाचा व पुरस्थ ग्रंथीचा कर्करोग हा संप्रेरकांशी निगडित आहे.