दिल्लीमधील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर करोना पॉझिटिव्ह आढळल्याने कॅन्सर रुग्णालय बंद करण्याची वेळ आली आहे. हा डॉक्टर युकेवरुन आलेल्या आपल्या भावाची भेट घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेला होता. यावेळी त्याला करोनाची लागण झाली. डॉक्टरला करोनाची लागण झाल्याने रुग्णालय बंद करण्यात आलं आहे.

हा डॉक्टर पूर्व दिल्लीमधील सरकारी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होता. बुधवारी डॉक्टरला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं. या डॉक्टरने कुठेही परदेशात प्रवास केलेला नव्हता. पण भावाच्या संपर्कात आल्याने त्याला करोनाची लागण झाली असल्याची शक्यता आहे. कोणत्याही करोना रुग्णावर हा डॉक्टर उपचार करत नव्हता. सध्या त्याच्यावर दिल्लीमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आणखी वाचा- देशात १२ तासांत वाढले २४० करोना रुग्ण, एकूण संख्या १६३७ वर

दरम्यान डॉक्टरला करोनाची लागण झाली असल्या कारणाने निर्जुंतीकरण करण्यासाठी सध्या हॉस्पिटल बंद करण्यात आलं आहे. ६० रुग्ण सध्या रुग्णालयात आहेत. ओपोडी सध्या बंद असून वॉर्ड मात्र सुरु ठेवण्यात आले आहेत. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या कोणत्याही रुग्णावर तात्काळ उपचार करण्याची किंवा डिस्चार्ज करण्याची गरज नाही आहे.

आणखी वाचा- Coronavirus: रात्री दोन वाजता अजित डोवाल यांनी मशीद रिकामी करायचं मिशन केलं पूर्ण

याआधी दिल्लीत दोन मोहल्ला क्लिनिकमधील डॉक्टर करोना पॉझिटिव्ह आढळल्याने शेकडो लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. दिल्लीमध्ये मंगळवारपर्यंत करोनाचे एकूण १२० रुग्ण सापडले आहेत.