जेव्हा गुलाम अब्बास अचानक कमी झालेलं वजन आणि वारंवार होणाऱ्या उलटीच्या त्रासाची तक्रार घेऊन दवाखान्यात गेले तेव्हा त्यांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी धक्कादायक बातमी मिळेल याची अजिबात कल्पना नव्हती. दुबईत इंजिनिअर असणाऱ्या गुलाम अब्बास यांना पोटाचा कॅन्सर झाला असल्याचं निदान झालं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्यापुढे दोनच पर्याय होते ते म्हणजे एकतर पोटाशिवाय जगायचं किंवा मृत्यूला कवटाळणे.

नक्कीच अब्बास यांनी पहिला पर्याय निवडला. मात्र डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पोटाची आतडी काढण्याआधी त्यांनी एक इच्छा व्यक्त केली. ती म्हणजे शेवटची एकदा आपल्याला पोट भरुन बिर्याणी खायची आहे. अब्बास यांनी डॉक्टरांनी बिर्याणी खाऊ देण्यासाठी विनंती केली. डॉक्टरांनीही त्यांची इच्छा मान्य करत परवानगी दिली.

अब्बास यांच्या पत्नीने बिर्याणी केली आणि त्यांचा भाऊ ती रुग्णालयात घेऊन आला. यापुढे कधीच बिर्याणी खाण्यासाठी मिळणार नसल्याने अब्बास अक्षरक्ष: त्यावर तुटून पडले होते असं वृत्त खलीज टाइम्सने दिलं आहे.

अब्बास यांना दोन मुलं आहेत. मुलगा दीड वर्षांचा असून, सहा वर्षांची मुलगी आहे. सर्जरी न करता मृत्यूला कवटाळून आपल्या मुलांच्या डोक्यावरील पिताचं छत्र काढून घेणं त्यांना शक्य नव्हतं. यामुळेच त्यांनी सर्जरीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. जगभरात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये पोटाच्या कॅन्सर झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

यावेळी महत्त्वाचा प्रश्न समोर उभा राहतो तो म्हणजे, पोटाशिवाय अब्बास जगणार कसे ? पोटाची आतडी काढून घेतली याचा अर्थ अब्बास जेवू शकणार नाहीत असा होत नाही. मात्र त्यांच्या खाण्यावर बंधनं येतील. त्यांना हलकं फुलकं, तसंच कमी तिखट पदार्थ खावे लागणार आहेत. डॉक्टरांनी सर्जरीनंतर काही दिवसांनी लगेचच अब्बास अन्न सेवन करु शकतील अशी माहिती दिली आहे, मात्र तोपर्यंत त्यांना पाणी आणि इतर द्रव्य सेवन करावं लागणार आहे.