अध्यात्मामध्ये एक प्रकारची मानसिक शक्ती असते, हे बहुधा कुणी नाकारणार नाही. मानसिक ताण-तणाव, चिंता, क्रोध, व्यसन आदींवर अध्यात्मामुळे नियंत्रण मिळवता येते हे सिद्ध झाले आहे. ‘कर्करोगग्रस्तांना तर अध्यात्मामुळे मानसिक व शारीरिक बल मिळते,’ असा निष्कर्ष अमेरिकी शास्त्रज्ञांनी काढला आहे.
वॉशिंग्टनमधील मॉफ्फिट कर्करोग रुग्णालयातील हेदर जिम यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने ‘कर्करोग आणि अध्यात्म’ या विषयावर संशोधन केले. त्यासाठी ४४,००० कर्करोगग्रस्तांचा अभ्यास करण्यात आला. बहुतेक कर्करोगग्रस्त मानसिक मनोबल वाढविण्यासाठी अध्यात्माकडे वळल्याचे या संशोधकांना आढळले. अध्यात्मामुळे रुग्णाच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.
या संशोधकांनी सर्वप्रथम रुग्णांच्या शारीरिक आरोग्याचा अभ्यास केला. अध्यात्माकडे वळलेल्या कर्करोगग्रस्तांचे आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारलेले दिसले आणि कर्करोगाची बरीच लक्षणे कमी झाल्याचेही दिसून आले. ‘‘अध्यात्माचा शरीर आणि मनावर परिणाम होतो. कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर रुग्णाला नैराश्य येते. आयुष्य निर्थक वाटते. पण अध्यात्माचा वापर केल्याने आयुष्याला काहीतरी अर्थ आहे, असे वाटते आणि जगण्याचा उत्साह वाढतो,’’ असे जिम यांनी सांगितले.
अध्यात्माचा वापर वाढल्याने कर्करोगग्रस्ताचे शारीरिक आरोग्यही पूर्वीपेक्षा अधिक सुधारलेले दिसते. अध्यात्म म्हणजे विविध धर्मातील सकारात्मक पैलू. पण वर्तणुकीसंदर्भातील धार्मिक पैलू याचा अध्यात्माशी संबंध नाही, असेही जिम म्हणतात. प्रार्थना, चिंतन किंवा ध्यानधारणा हे अध्यात्माचे पैलू आहेत. याचा वापर केल्यास कर्करोगग्रस्ताचे आरोग्य सुधारू शकते.
अध्यात्मातील भावनिक पैलूंचा मानसिक आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे सकारात्मकता वाढते. अध्यात्मामुळे चिंता, नैराश्य आणि वेदना कमी होते, हे बहुतेकांना माहीत आहे. त्यामुळेच मानसिक आरोग्य सुधारावे यासाठी कर्करोगग्रस्त अध्यात्माकडे वळतात, पण त्यांचे शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठीही अध्यात्माची मदत होते, असे जिम यांना संशोधन सहाय्य करणाऱ्या जॉन साल्समन यांनी सांगितले.