येत्या इ.स. २०३० पर्यंत अमेरिकेत महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ५० टक्क्य़ांनी वाढेल; त्याला बदलती जीवनशैली व वाढती लोकसंख्या ही कारणे असतील असे नवीन अभ्यासात म्हटले आहे.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटने केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, २०३० पर्यंत अमेरिकेत ४४१००० इतक्या स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालेले असेल व या स्त्रिया ३० ते ८४ वयोगटातील असतील. २०११ मध्ये २८३००० स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते.
यातील मुख्य संशोधक फिलीप रोझेनबर्ग यांनी सांगितले की, वाढती लोकसंख्या व बदलती जीवनशैली ही कारणे यात असतील. लोकांचे जीवनमान वाढले आहे, पण त्याचबरोबर कर्करोगाची शक्यता वाढत चालली आहे. स्त्रियांच्या वेगवेगळ्या पिढयांमध्ये जीवनशैलीचे घटक वेगळे असतात व त्याचा परिणाम स्तनाच्या कर्करोगावर होत असतो. आजच्या पिढीतील स्त्रिया त्यांच्या मुलांना मागील पिढीतील स्त्रियांच्या तुलनेत कमी प्रमाणात स्तनपान देतात, असे रोझेनबर्ग यांचे मत आहे.
वयस्कर स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त असेल, त्यात ७० ते ८४ वयोगटात ते २०११ मध्ये २४ टक्के होते, ते २०३० मध्ये ३५ टक्के होईल.
५० ते ६९ वयोगटात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ५५ टक्क्य़ांवरून ४४ टक्के इतके खाली येईल. नवीन अभ्यासानुसार स्तनाच्या कर्करोगामध्ये दोन्ही स्तन काढून टाकण्यानेही फार परिंणाम होत नाही. वयस्कर रूग्णांमध्ये निदान करणे कठीण असते, कारण मॅमोग्राफी हे त्यात विश्वासार्ह तंत्र ठरत नाही असे टेक्सास विद्यापीठाचे संशोधक श्ॉरॉन गिओरडानो यांनी सांगितले. याचा अर्थ कर्करोगाचे निदान व उपचार थांबवायचे असा नाही, तर त्यासाठी वेगळ्या पद्धती शोधल्या पाहिजेत. कर्करोगाविषयीचे अंदाज हे आरोग्य क्षेत्रातील धोरणकर्त्यांना सजग करणारे आहेत व त्यामुळे त्यांनी ही आव्हाने पेलण्यास सज्ज राहिले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्करोग वाढण्याची कारणे
’बालकांना स्तनपान कमी काळ देणे
’लोकसंख्येतील वाढ
’जीवनशैलीतील बदल