गाझियाबाद जवळील जनपद येथील राष्ट्रीय महामार्ग ९ वर पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला. यादरम्यान महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे पोलिसांनी १५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडला. इंदिरापूरम, नोएडा आणि खोडा येथील शेकडो लोकांनी राष्ट्रीय महामार्ग ९ वर कँडल मार्च काढला. हा मार्च संपल्यानंतर काही लोकांनी तिथे गोंधळ केला. त्यामुळे येथे सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक कोंडी झाली.

पोलीस अधीक्षक सदर श्लोक कुमार म्हणाले की, सोमवारी रात्री सुमारे १५० लोकांनी राष्ट्रीय महामार्ग ९ वर कँडल मोर्चा काढला होता. मार्च संपल्यानंतर त्यांच्या गोंधळामुळे सुमारे २ तास येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. याप्रकरणी १५० लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मदच्या एका आत्मघातकी हल्लेखोराने १०० किलोची स्फोटके असलेले वाहन सीआरपीएफच्या वाहनाला जाऊन धडकवले होते. यामुळे झालेल्या स्फोटात जवान शहीद झाले होते.

सीआरपीएफचे २५०० हजार हून अधिक जवान ७८ वाहनांमधून प्रवास करत होते. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास श्रीनगर-जम्मू महामार्गावर दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरात परिसरात हल्ला करण्यात आला होता.