चंद्राच्या भुपृष्ठावर असलेल्या विक्रम लँडरशी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) वैज्ञानिक संपर्क साधू शकतील का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. कधीपर्यंत विक्रम लँडरशी संपर्क होऊ शकतो? ते किती दिवस कार्यरत राहिलं? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच चांद्रयान २ च्या ऑर्बिटरच्या माध्यमातून इस्त्रो पुन्हा लँडरशी संपर्क करण्याच प्रयत्न करत आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हे विक्रम लँडर इस्रोने चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये इस्रोला अपयश आले. या घटनेला पाच दिवस झाले आहेत. मात्र या लँडरशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. विक्रम लँडरशी संपर्कासाठी आता वेळेशी स्पर्धा असून लँडरचा कार्यकाल १४ दिवसांचाच असताना त्यातील चार दिवस संपले आहेत. त्यामुळे उर्वरित दहा दिवसांत त्याच्याशी संपर्क झाला तर ठीक अन्यथा विक्रम लँडरचा शेवट होणार आहे. त्यातच हे लँडर ज्या भागात उतरले आहे तेथील तापमान उणे २०० डिग्री सेल्सियस असल्याने या वातावरणाचाही लँडरवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विक्रम लँडरशी संपर्कासाठी आता वेळेशी स्पर्धा असून लँडरचा कार्यकाल १४ दिवसांचाच असताना त्यातील चार दिवस संपले आहेत. लँडर विक्रममध्ये प्रज्ञान ही रोव्हर गाडी आहे. ती लँडरशी संपर्क असल्याशिवाय बाहेर काढता येणार नाही. त्यामुळे त्याचा संशोधनाच्या पातळीवर कुठलाही उपयोग होणार नाही. लँडर आघाती अवतरणानंतर कुठलीही मोडतोड न होता तेथे पडल्याच्या माहितीबाबतही वैज्ञानिकात मतभिन्नता आहे. सात सप्टेंबरला विक्रम लँडर शनिवारी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा प्रयत्न केला पण अगोदर ते व्यवस्थित खाली येत असताना अचानक त्याचा संपर्क चंद्राच्या पृष्ठभूमीपासून २.१ कि.मी उंचीवर असताना तुटला होता व त्यानंतर ते तेथे कोसळले होते. इस्रोने रविवारी असे सांगितले की, विक्रम लँडरचे आघाती अवतरण झाले. रविवारी हे लँडर चंद्राच्या पृष्ठभूमीवर पडल्याचे छायाचित्र ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने टिपले होते. ऑर्बिटर अजून सुरक्षित असून लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इस्रोने असे म्हटले आहे की, ऑर्बिटरच्या छायाचित्रानुसार हे लँडर अजून तुटलेले नसून जसेच्या तसे चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेले आहे. हे लँडर कललेल्या अवस्थेत आहे. ते चार पायावर उभे नाही. ते उभ्या अवस्थेत नाही.

या गावातून संपर्क

विक्रमशी संपर्क करण्यासाठी इस्रोच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कर्नाटकमधील बयालालू गावामध्ये ३२ मीटरचा अँटीना उभारण्यात आला आहे. बंगळुरुमधील स्पेस नेटवर्क सेंटरच्या माध्यमातून या अँटीनाच्या मदतीने विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. लँडरला कोणतेही नुकसान झालेले नसले तरी ते कललेल्या अवस्थेत आहे. लँडरमधील प्रज्ञान हा गाडीसारखा भाग चंद्राच्या पृष्ठभागावर उतरुन मातीचे नमुने गोळा करणार होता.

चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान

चंद्राच्या ध्रवीय प्रदेश हा प्रचंड थंड आहे. तेथील तापमान कायमच शून्य अंशाखाली असते. ज्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात चांद्रयानचा भाग असणारे लँडर उतरले आहे तेथील तापमान अनेकदा उणे २०० डिग्री सेल्सियस पर्यंत कमी होते. या भागामध्ये आजपर्यंत कोणतेही यान उतरलेले नाही. त्यामुळेच तेथील वातावरणाचा अंदाज बांधणे जिकरीचे आहे.

लँडरच्या अवस्थेबाबत इस्रोने अधिकृत भाष्य केलेले नाही. चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम), रोव्हर (प्रज्ञान) असे तीन भाग आहेत. लँडर व रोव्हरचा कार्यकाल १ चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवसांचा आहे. त्यामुळे या काळात जर त्याच्याशी संपर्क झाला नाही तर लँडरचा या प्रयोगातील संबंध कायमचा संपलेला असेल.

इस्रो अधिकाऱ्यांच्या मते हे लँडर जेथे उतरणे अपेक्षित होते त्या ठिकाणापासून ५०० मीटर अंतरावर पडले आहे. लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून अखेरच्या टप्प्यात वेग कमी करत असताना त्याची दिशा चुकली असावी. संवेदक, सॉफ्टवेअर किंवा संगणक बिघाडामुळे तसे झाले असावे. लँडरच्या अपयशाबाबत समिती नेमण्यात आली असून ती त्यात नेमके काय चुकले असावे, यावर प्रकाश टाकणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candrayaan 2 lander vikram is fighting deadline and extremely cold temperature of minus 200 degree celsius scsg
First published on: 11-09-2019 at 14:49 IST