प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी उत्तुंग कामगिरी भारतीय विद्यार्थ्यांनी केली आहे. अमेरिकन अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी (AAS) आणि अमेरिकन इन्स्टिट्युट ऑफ एअरोनॉटिक्स अॅण्ड अॅस्ट्रोनॉटिक्स (AIAA)तर्फे घेण्यात आलेल्या CanSat 2017 या जागतिक स्पर्धेत उत्तराखंडमधील पेट्रोलियम आणि ऊर्जा अध्ययन विद्यापीठातील (UPES) विद्यार्थ्यांच्या चमूने अव्वल स्थान मिळवले आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये ही जागतिक स्पर्धा आयोजित केली होती. त्यात जगभरातील विद्यार्थ्यांचे ३९ चमू सहभागी झाले होते. त्यांना मागे टाकत भारतीय विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली आहे.

अमेरिकन अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी (AAS) आणि अमेरिकन इन्स्टिट्युट ऑफ एअरोनॉटिक्स अॅण्ड अॅस्ट्रोनॉटिक्स (AIAA)तर्फे घेण्यात आलेल्या या जागतिक स्पर्धेत भाग घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना प्राध्यापक उगर गुवेन आणि जोजिमस लबाना यांनी मार्गदर्शन केले. अंतराळातील घडामोडींशी संबंधित विषयांवर आधारित ही स्पर्धा घेतली जाते. भारतीय चमूत एअरोस्पेस इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, इन्स्ट्रूमेंटेशन अॅण्ड कंट्रोल इंजिनिअरिंग अॅण्ड डिझाईन स्टडीजचे विद्यार्थी होते. भारतीय विद्यार्थ्यांच्या चमूसह प्रिंस्टन विद्यापीठ, मॅँचेस्टर विद्यापीठ, अलाबामा विद्यापीठ, व्हीआयटी विद्यापीठ आणि विमानन अॅकॅडमी या संस्थांसह ३९ संस्थांनी सहभाग घेतला होता. या ३९ संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या चमूला मागे टाकत भारतीय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत पहिले स्थान मिळवले. यूपीईएसमधील विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी ही इस्रोने अंतराळ क्षेत्रात नुकत्याच केलेल्या कामगिरीसारखीच आहे, अशा शब्दांत प्राध्यापक गुवेन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.