राज्यसभेत भाजपला बहुमत नाही आणि नेमकी हीच बाब कायदा करून अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या आड येत आहे, अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे दिली. विशेष म्हणजे, अयोध्येत राम मंदिर उभारण्यासंबंधी भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते. याखेरीज, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करणे, समान नागरी कायद्याची अंमलबजावणी आदी मुद्देही भाजपच्या जाहीरनाम्यात होते.
राज्यसभेत भाजपचे बहुमत नाही आणि त्यामुळे राम मंदिराची उभारणी करण्यासाठी संसदेत तसा ठराव आणणे आता शक्य नाही, अशी कबुली राजनाथ सिंह यांनी दिली.
मात्र, भाजपला बहुमत मिळाल्यास सरकार राम मंदिरासाठी ठराव आणेल काय, असे विचारले असता, हा प्रश्न काल्पनिक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यसभेचे संख्याबळ २४३ असून त्यामध्ये भाजपचे केवळ ४५ सदस्य आहेत तर विरोधकांचे किमान १३२ खासदार आहेत, याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले.