पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धू? काँग्रेसमधील अस्थिरतेची चर्चा

अपमानित झाल्यासारखे वाटत असल्याचे मत व्यक्त करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मतभेदांचा एक अध्याय संपला असला तरी चार महिन्यांत तेथे निवडणुका होणार असल्याने पक्षासाठी अनिश्चिततेचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी प्रदेशाध्यक्ष नवज्योर्तंसग सिद्धू यांच्यासह सुनील जाखड, सुखजिंदरसिंग रंधवा, प्रतापसिंग बाज्वा यांच्या नावाची चर्चा आहे; परंतु पंजाब काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे अधिकार काँग्रेस आमदारांनी शनिवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिले.

काँग्रेसच्या शक्तिशाली अशा प्रादेशिक नेत्यांपैकी एक असलेले अमरिंदर सिंग यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. ‘‘हा माझा पंजाब आहे. मी माझ्या राज्यासाठी शक्य ते सर्व केले. मी गेली ५२ वर्षे राजकारणात आहे, यापुढेही राहीन. मी राजीनामा दिला आहे; परंतु राजकारणात पर्याय कधीच संपत नाहीत,’’ असे अमरिंदर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

अमरिंदर यांनी दुपारी साडेचार वाजल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळासह राजीनामा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे सुपूर्द केला. राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नियमित कार्यालयीन कामकाज सांभाळण्याच्या सूचना अमरिंदर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला केल्या आहेत. अमरिंदर यांचा हे राजीनामापत्र अवघ्या एका ओळीचे आहे.

शिरोमणी अकाली दलाला सत्तेवरून खाली खेचून आणि ‘आप’च्या सत्तेवर येण्याच्या आशा धुळीस मिळवून चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तारूढ करण्याचे श्रेय अमरिंदर यांना दिले जाते. ‘‘पक्षाने आमदारांना पाचारण करण्याची ही तिसरी वेळ आहे. तुम्हाला माझ्याविषयी शंका आहे. त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखे वाटते,’’ असे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना राजीनामा सादर केल्यानंतर पंजाब राजभवनाबाहेर अमरिंदर्रंसग यांनी पत्रकारांना सांगितले.

अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या ५०हून अधिक आमदारांनी सोनिया गांधी यांना लिहिले होते. यामुळे अमरिंदर यांच्या इच्छेविरुद्ध अलीकडेच प्रदेशाध्यक्षपदी नेमण्यात आलेले माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू आणि अमरिंदर यांच्यात अनेक महिन्यांपासून सुरू असलेली गटबाजी पुन्हा उफाळली होती. पंजाबच्या ११७ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे ८० आमदार आहेत.

यापुढील वाटचालीबाबत विचारले असता, ‘‘माझ्या भविष्यातील राजकारणाबद्दल सांगायचे झाले, तर पर्याय नेहमीच उपलब्ध असतो आणि वेळ येईल तेव्हा मी पर्यायाचा उपयोग करीन,’’ असे उत्तर अमरिंदर यांनी दिले. मी काँग्रेस पक्षात आहे. माझ्या समर्थकांशी चर्चा करून राजकारणातील पुढील वाटचालीची दिशा ठरवीन. ज्याच्यावर विश्वास असेल त्याला पक्ष मुख्यमंत्रिपद देईल, असे अमरिंदर यांनी सांगितले.

‘सिद्धू यांना विरोध’ 

मुख्यमंत्रिपदासाठी नवज्योतसिंग सिद्धू यांचे नाव पुढे केले गेल्यास त्याला मी तीव्र विरोध करीन, असे अमरिंदर यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सिद्धू यांचे मित्र आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशीही सिद्धू यांचे संबंध आहेत. त्यामुळे देशाच्या हितासाठी मी त्यांच्या नावाला विरोध करीन, कारण हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न आहे, असेही अमरिंदर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमरिंदर यांनी पंजाब आणि काँग्रेससाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा करणारा व त्यांचे आभार मानणारा दुसरा ठराव या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला, असे केंद्रीय निरीक्षक अजय माकन यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. माकन म्हणाले, ‘‘अमरिंदर सिंग यांचे पक्षाला यापुढेही मार्गदर्शन मिळत राहील, अशी आम्ही आशा करतो.’’

पक्षनेता निवडण्याचे  अधिकार सोनियांना

अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाब काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे अधिकार राज्यातील काँग्रेस आमदारांनी शनिवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिले. पक्षाचे ८० पैकी ७८ आमदार या बैठकीला हजर होते, असे केंद्रीय निरीक्षक अजय माकन यांनी पत्रकारांना सांगितले.

राहुल, प्रियांका यांच्या  आग्रहामुळे निर्णय?

पंजाबचा मुख्यमंत्री बदलण्याच्या निर्णयामागे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वद्रा यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे. अमरिंदर यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याच्या निर्णयावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन

गट पडल्याचे सांगण्यात येते. आता पंजाबपाठोपाठ राजस्थान आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्रीही बदलणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

नवज्योतसिंग सिद्धू हे देशविरोधी : अमरिंदर

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर यांनी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर कठोर शब्दांत हल्ला चढवला. सिद्धू हे राष्ट्रविरोधी, घातक आणि आपत्ती आहेत. त्यांना मुख्यमंत्री म्हणून कदापि स्वीकारणार नाही. ते या पदासाठी लायक नाहीत. त्यांच्यामुळे देशाला धोका आहे, अशा शब्दांत अमरिंदर यांनी सिद्धू यांचे वाभाडे काढले. पक्षाचा माझ्यावर विश्वास नसल्यामुळे मला अपमानित झाल्यासारखे वाटते.

पक्ष ज्याच्यावर विश्वास असेल त्याला मुख्यमंत्रिपद देईल. माझ्या बाबतीत सांगायचे तर, राजकारणात पर्याय कधीच संपत नाहीत.  – अमरिंदर सिंग, माजी मुख्यमंत्री, पंजाब