लंडन येथील प्रसिद्ध नॅचरल हिस्ट्री म्युझियमजवळ एका कारने काही लोकांना धडक दिली. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेमके किती लोक जखमी झाले त्याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले ट्विट केले आहे. तसेच ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’च्या अधिकृत ट्विटर हँडलनेही या संदर्भातले ट्विट केले आहेत.

जगभरातील पर्यटक लंडनमध्ये पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे इथे कायमच वर्दळ असते. अशाच वर्दळीच्या ठिकाणी कारचालकाने फुटपाथवर गाडी चढवल्याचे तेथील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. यानंतर तातडीने पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. गाडी फुटपाथवर चढवणे हा अपघात होता की घातपात याची चौकशी आता करण्यात येते आहे.