पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरामुळे सध्या लोकांमध्ये सरकारविरोधी रोष उत्त्पन्न झाला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री अल्फान्सो कन्नथनम यांनी या दरवाढीचे समर्थन करताना ग्राहकांनाच फटकारले आहे. ही दरवाढ न परवडायला चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांकडे पैशांची कमी आहे का?, ते नक्कीच उपाशी राहत नसतील. ज्यांना पैसे द्यायला परवडते त्यांनी ते दिलेच पाहिजेत, असे त्यांनी खडसावून सांगितले.

समाजातील पिचलेल्या वर्गासाठी केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. अनेक गावांमध्ये वीज पोहोचवायची आहे, अनेकांना निवारा उपलब्ध करून द्यायचाय तर काही ठिकाणी शौचालयांची व्यवस्था करायची आहे. या सर्व उपक्रमांसाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होतो. त्यामुळे ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांच्याकडून आम्ही जास्त कर आकारत आहोत. जेणेकरून गरिबांना प्रतिष्ठेने जीवन जगता येणे शक्य व्हावे. त्यासाठी सरकार कराच्या रूपाने पैसा गोळा करत आहे. आम्ही तो चोरत नाही, असे कन्नथनम यांनी सांगितले.

पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत चाललेल्या दराने बुधवारी गेल्या तीन वर्षांत प्रथमच उच्चांक गाठला होता. मुंबईत बुधवारी पेट्रोलचे दर लिटरला ७९ रुपये ४८ पैशांवर गेले. याआधी १ ऑगस्ट २०१४ रोजी पेट्रोलचे दर ८१ रुपये १५ पैसे होते. नवीन धोरणानुसार सध्या पेट्रोलचे भाव रोजच्या रोज बदलले जात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत तुलनेने कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे भाव मात्र त्या प्रमाणात कमी झालेले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. मात्र पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी आताची दरवाढ ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतीस अनुसरूनच असल्याचे म्हटले असून, इंधनतेल दरनिश्चितीच्या सध्याच्या धोरणात बदल करण्यास त्यांनी नकार दिला होता.