वर्षभरात दोन वेळा विस्तारित करण्यात आलेली वाहनांवरील उत्पादन शुल्क सवलत वर्षमावळतीला संपुष्टात येणार असून यामुळे नव्या वर्षांत प्रवासी वाहनांच्या किमती वाढणार आहेत. उत्पादन शुल्क कपात सवलतीची मर्यादा पुन्हा न वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या हालचालीमुळे वाहने महाग होणार आहेत.
  २०१४ मध्ये सुरुवातीला फेब्रुवारी व नंतर जूनमध्ये उत्पादन शुल्क कपातीतील सवलत कायम ठेवण्यात आली होती. आता ही उत्पादन शुल्कातील सवलत आणखी विस्तारली जाणार नाही, असे केंद्र सरकारमधील प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.
भारतीय वाहन उद्योगाने गेली सलग दोन वर्षे विक्रीतील घसरण नोंदविली आहे. तर चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान उद्योगाची विक्री १०.०१ टक्क्यांनी वाढली. विद्यमान अर्थवर्षांतील आठ महिन्यांत १.३३ कोटी वाहने विकली गेली. उत्पादन शुल्कातील कपात सवलत मागे घेतली गेल्यास अल्टो ८००, नॅनोसारख्या छोटय़ा कारच्या किमती ८ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत वाढणार आहेत. तर मारुती स्विफ्ट, ह्य़ुंदाई एलाईट२०सारख्या हॅचबॅक वाहनांचे दर १८ हजार ते ३० रुपयांपर्यंत महाग होणार आहेत. आणखी सवलत दिली जाणार नाही, हे हेरून वाहन कंपन्या, विक्रेते हे डिसेंबरच्या अखेरच्या पंधरवडय़ापासून त्वरित स्वस्तातील वाहन खरेदीचे आवाहन प्रचार मोहिमेद्वारे करत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील आर्थिक घडामोडी व परकी चलनातील फरक यामुळे मारुती सुझुकीसारख्या स्थानिक तसेच बीएमडब्ल्यूसारख्या विदेशी कंपन्यांनी यापूर्वीच जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढविण्याचे धोरण अनुसरले आहे.