उत्तराखंड येथील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वाघाचा मृतदेह या उद्यानात आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार या वाघाचा मृत्यू नैसर्गिक आहे असे वाघांसाठी राखीव असलेल्या विभागाचे संचालक राहुल कुमार यांनी म्हटले आहे. या वाघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर या वाघाच्या मृत्यूमागचे नेमके कारण समजू शकेल असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र या वाघाचा मृत्यू नैसर्गिक असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

आजच मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बाजीराव या पांढऱ्या वाघाचा मृत्यू झाला. बाजीराव २००१ मध्ये जन्मला होता. वाघाचे सरासरी वय १८ वर्षे असते त्याचमुळे हा वाघ वार्धक्याने मरण पावला असे या उद्यानातर्फे स्पष्ट करण्यात आले. या घटनेला काही तास उलटले आहेत तोच जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यात आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.