राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिवाळीच्या दरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. शिवाय, उत्तर प्रदेशमधील गोरखपुरमध्ये पाच संशयीत दहशतवादी शिरले असल्याची देखील गुप्तचर यंत्रणांकडून माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा देखील देण्यात आला आहे व सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. नेपाळ सीमेवर एसएसबी आणि उत्तर प्रदेश पोलीसांकडून संयुक्तरित्या शोधमोहीम राबवली जात आहे.

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले जात आहे की, काही संशयीत दहशतावादी आज (१७ ऑक्टोबर) रोजी दिल्लीत एकत्र येतील. त्यांच्याकडे एक वाहन देखील आहे. ही माहिती गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या फोन टॅपिंगनंतर प्राप्त झाली असुन, यातील काही संशयीत काश्मीरहून दिल्लीत पोहचणार असल्याचेही सांगितले जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडे या संशयीत दहशतवाद्यांचे रेखाचित्र देखील असल्याने, त्याच्या आधारावर त्यांची शोधमोहीम राबवली जात आहे.

लश्कर ए तोयबाच्या हस्तकांनी मार्च महिन्यात गोरखपुरसह अन्य काही शहारांमध्ये रेकी केल्याचे व गोरखपुरमधील काही जणांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर गोरखपुरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. सुनील गुप्ता यांनी सर्व अप्पर पोलीस अधीक्षक,पोलीस उपधीक्षकांसह जिल्हाभरातील पोलीस यंत्रणेस सतर्कतेचे आदेश दिले आहेत.