इजिप्तमधील सुएझ कालव्यात मालवाहू जहाज अडकून पडल्यानंतर भरतीच्या लाटांचा लाभ घेऊन ते बाहेर काढण्याचे प्रयत्न  करण्यात येणार आहेत. पूर्व- पश्चिम असा सागरी मार्ग त्यामुळे जागितक वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.

पनामाचा ध्वज असलेले हे मालवाहू जहाज आशिया व युरोप दरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. मंगळवारी एका निमुळत्या भागात ते आफ्रिका व सिनाई द्वीपकल्पात अडकून पडले, त्यामुळे सागरी वाहतूक कोंडी झाली होती. हे मोठे जहाज असून कालव्याच्या सहा किलोमीटर उत्तरेला दक्षिण प्रवेशद्वाराकडे ते सुएझ शहरानजीक अडकून पडले आहे.

बर्नहार्ड शुल्ट जहाज व्यवस्थापन कंपनीचे तंत्रज्ञान व्यवस्थापक एव्हर गिव्हन यांनी सांगितले, की शुक्रवारी हे जहाज बाजूला काढण्याचे प्रयत्न फसले आहेत. हे मोठे जहाज हलवण्यासाठी आतल्या भागात पाणी ओतून विशिष्ट यंत्रणेचा वापर करून ते दूर करण्याचा प्रयत्न रविवारी करण्यात येणार आहे.

सुएझ कालवा प्राधिकरणाने म्हटले आहे, की शनिवारी जहाज बाजूला करण्यासाठी दोनदा प्रयत्न करण्यात आले. जास्त भरतीच्या लाटांचा फायदा घेऊन हे प्रयत्न केले गेले. जपानच्या शोई कायसन केके कंपनीने १०  बोटी हे जहाज बाजूला काढण्यासाठी पाठवल्या आहेत.

शोई कायसेन कंपनीचे अध्यक्ष युकिटो हिगाकी यांनी सांगितले, की त्यांनी १० बोटी  हे जहाज किनाऱ्यावर आणण्याच्या मोहिमेसाठी पाठवल्या आहेत. हे जहाज पुन्हा तरंगू शकणार नसेल तर त्याचे कंटेनर्स वेगळे करावे लागणार आहेत, पण ते खूप अवघड आहे.

अमेरिकेचा मदतीचा प्रस्ताव

अमेरिकेतील वृत्तानुसार व्हाइट हाऊसने इजिप्तला सुएझ कालवा मोकळा करून देण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. इतर देशांकडे जी क्षमता नाही ती आमच्याकडे आहे त्यामुळे हा मार्ग आम्हीच मोकळा करू शकतो असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.