प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्रावरून फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्या झाल्यानं तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. या व्यंगचित्रावरून जगभरातील मुस्लीम राष्ट्रांमध्ये पडसाद उमटताना दिसत आहेत. त्याचबरोबर करण्यात आलेल्या हल्ल्याचाही निषेध केला जात आहे. दरम्यान, फ्रान्समध्ये झालेल्या हल्ल्याचं प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी समर्थन केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राणा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

मोहम्मद पैगंबराच्या कार्टूनवरून सुरू झालेल्या वादातून फ्रान्समध्ये गुरुवारी रक्तपात घडला. काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाची हत्या करण्यात आल्यानंतर गुरुवारी फ्रान्समधील नीस शहरात एका चर्चेमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांने तिघांचे प्राण घेतले होते. व्यंगचित्र आणि त्यानंतर झालेल्या हल्ल्याचे जगभर पडसाद उमटत असताना मुनव्वर राणा यांनी हल्ल्याचे समर्थन केलं आहे.

आणखी वाचा- फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्लिमांचं आंदोलन; गर्दी पाहून भाजपा नेता म्हणाले…

मुनव्वर राणा म्हणाले,”जर धर्म आईसारखाचं आहे, तर कुणी आपल्या आईचं किंवा धर्माचं वाईट व्यंगचित्र काढत असेल. शिव्या देत असेल, रागामध्ये ती व्यक्ती असं करण्यासाठी मजबूर असते. मुस्लिमांना चिडवण्यासाठी असं व्यंगचित्र काढलं गेलं. जगामध्ये हजारो वर्षांपासून ऑनर किलिंग होत आहे. अखलाक प्रकरणात काय झालं?, पण तेव्हा कुणालाही त्रास झाला नाही. कुणालाही इतका त्रास देऊन नका की, तो हत्या करण्यासाठी मजबूर होईल,” असं मुनव्वर राणा यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये झालेल्या दहशतावादी हल्ल्याचा निषेध करत, भारत या लढाईमध्ये फ्रान्ससोबत उभा असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही मुनव्वर राणा यांनी भाष्य केलं. “राफेलमुळे पंतप्रधानांना असं बोलावं लागत आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- या लढ्यामध्ये भारत फ्रान्ससोबत; पंतप्रधान मोदींनी दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध

काय म्हणाले होते मोदी?

“आज नीसमधील चर्चमध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यासह फ्रान्समध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मी निषेध करतो. आमच्या सहवेदना हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या व फ्रान्समधील नागरिकांबरोबर आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत फ्रान्ससोबत उभा आहे आहे,” असं मोदी यांनी हल्ल्याचा निषेध करताना म्हटलं होतं.