राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याच्यावर दाखल करण्यात आलेला खटला गुजरात सरकारकडून गुरुवारी मागे घेण्यात आला. सरकारच्या सूचनेनुसार राजकोटचे जिल्हाधिकारी विक्रांत पांडे यांनी हे प्रकरण मागे घेण्याचे आदेश दिले.

पांडे यांनी आदेशात म्हटले आहे की, राजकोट येथे दाखल असलेले हार्दिक पटेल आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीवरील (पास) खटले मागे घेण्यात आले आहेत. आता हार्दिक विरोधात राजकोट जिल्ह्यात एकच खटला दाखल असून यासंबंधीची औपचारिकता पूर्ण करुन हे प्रकरण लवकरच न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्य पाच आंदोलकांवरील खटलेही मागे घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पाटीदार समाजाच्या आरक्षणविषयक आंदोलन समितीचा प्रमुख युवा नेता हार्दिक पटेल याच्यावर १९ ऑक्टोबर २०१५ रोजी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी सांगितले की, राजकोट येथे भारत-दक्षिण अफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यादरम्यान खंदेरी क्रिकेट स्टेडिअममध्ये जात असताना पोलिसांनी रोखल्याने माध्यमांशी बोलण्यासाठी पुढे जाताना हार्दिकच्या हातात असलेल्या राष्ट्रध्वजाचा अपमान झाला होता. हार्दिकने राष्ट्रध्वजावरुन उडी घेऊन पलिकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात त्याचा पाय राष्ट्रध्वजाला लागला होता.  त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या अपमान प्रकरणी त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.